Thu, Jun 27, 2019 16:13होमपेज › Nashik › नाशिक-मुंबई विमानसेवा थंडावली

नाशिक-मुंबई विमानसेवा थंडावली

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:44PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मुंबई विमानतळावर लॅण्डिंगसाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याने नाशिक-मुंबई विमानसेवा काहीशी गैरसोयीची झाली असतानाच आता प्रवाशांअभावी ही सेवा थंडावली आहे. परिणामी, विमानसेवा देणार्‍या एअर डेक्‍कनवर थेट विमानच रद्द करण्याची वेळ आली आहे.

गत महिन्यात मोठा गाजावाजा करत नाशिक ते मुंबई आणि पुणे अशा दोन मार्गांवर एअर डेक्‍कनने विमानसेवा सुरू केली. मात्र, मुंबई विमानतळावर सकाळी 7 वाजेच्या वेळेस लॅण्डिंगसाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याने एअर डेक्‍कने विमानाच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल केला. नाशिकहून सकाळी 12 वाजेला मुंबईसाठी विमानाचे टेकऑफ सुरू झाले. नवीन वर्षाच्या प्रारंभी तरी यात बदल होईल अन् नाशिकच्या विमानासाठी सकाळचा स्लॉट मिळेल, अशी आशा एअर डेक्‍कनला होती. दरम्यान, वेळापत्रकात बदल झाला तरी नाशिककरांकडून विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, गत आठवड्यात मुंबई विमानतळावरील स्लॉटच्या गैरसायीमुळे नाशिकच्या विमानसेवेचे रडगाणे पुन्हा सुरू झाले आहे. चुकीच्या वेळापत्रकामुळे नाशिककरांनी या सेवेकडे आता पाठ फिरवायला प्रारंभ केला आहे.

नाशिकहून विमानसेवा सुरू करतेवेळी एअर डेक्‍कनचे कॅप्टन गोपीनाथ यांनी मुंबई विमानतळावर डोमेस्टिक विमानांसाठी 25 टक्के वेळ राखीव ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई विमानतळाची जबाबदारी सांभाळणार्‍या ‘जीव्हीके’ या खासगी कंपनीकडून मनमानी कारभार केला जात आहे. परिणामी, नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील सेवेला त्याचा फटका बसत आहे. नाशिकप्रमाणेच इतर ठिकाणच्या सेवाही धोक्यात आल्या आहेत. नाशिकहून पुण्यासाठी सुरू असलेल्या सेवेचे भवितव्य अंधारमय झाले आहे.