Thu, Jul 18, 2019 05:03होमपेज › Nashik › नाशिकचे विमान जमिनीवरच!

नाशिकचे विमान जमिनीवरच!

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:29PMनाशिक : प्रतिनिधी

दोन महिन्यांपासून खंडित असलेली नाशिक-मुंबई विमानसेवा शुक्रवारी (दि.20) सुरू होणार होती. मात्र, सेवा देणार्‍या एअर डेक्कनच्या गलथान कारभारामुळे विमानाचे टेकऑफ होऊ शकले नाही. मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण एअर डेक्कनने दिले असले तरी यामुळे नाशिककरांचे विमान पुन्हा एकदा जमिनीवरच राहिले आहे. 

केंद्र सरकारच्या उडान योजनेत एअर डेक्कन कंपनीतर्फे नाशिक-मुंबईसाठी शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून नियमित सेवा सुरू केली जाणार होती. सकाळच्या विमानाने मुंबई गाठण्यासाठी वेळेअगोदरच प्रवासी ओझर विमानतळावर पोहोचलेदेखील होते. परंतु, एअर डेक्कन कंपनीने कोणतेही कारण न देता विमान रद्द केल्याची घोषणा केली. कंपनीच्या नाशिकमधील अधिकार्‍यांकडे प्रवाशांनी विमान रद्द करण्याचे कारण विचारले. मात्र, अधिकार्‍यांकडून योग्य उत्तरे दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. मुंबईप्रमाणेच सायंकाळची पुण्याची सेवाही यामुळे बाधित झाली आहे. मुंबई विमानतळावर लॅण्डिंगसाठी स्लॉट उपलब्ध न झाल्याने सेवा रद्द करावी लागल्याचे कारण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून दिले जात आहे.

मात्र, गुरुवारी रात्रीपर्यंत मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध झाला असून, आता यापुढे नियमित सेवा सुरू राहील, असे कंपनीतर्फे सांगण्यात येत होते. त्यामुळे अवघ्या काही तासांमध्येच असे काय घडले की नाशिकच्या विमानाला लॅण्डिंगसाठी स्लॉट मिळाला नाही, याबाबत चर्चा झडू लागल्या आहेत. दरम्यान, पुढील आठ दिवसांत स्लॉटची अडचण दूर होऊन नियमित सेवा सुरू होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे.  उडान योजनेत मोठा गाजावाजा करत एअर डेक्कन कंपनीने गत डिसेंबरमध्ये नाशिक ते मुंबई व पुण्यासाठी विमानसेवा सुरू केली.

काही दिवस सुरळीत चाललेल्या या सेवेला नंतर पुन्हा ग्रहण लागले. फेब्रुवारीच्या मध्यात पहिले तांत्रिक अडचण व त्यानंतर प्रशिक्षित पायलट नसल्याचे कारण देत कंपनीने अनिश्‍चित काळासाठी सेवा बंद केली. मुंबई-पुण्याची खंडित झालेली सेवा शुक्रवारपासून पुन्हा नियमित सुरू होणार होती. परंतु, स्लॉट मिळत नसल्याचे कारण देत अचानकपणे मुंबईचे विमान रद्द करण्यात आले. त्यामुळे हवाई सेवेचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या नाशिककरांचे विमान नैराश्येच्या गर्तेत सापडले आहे.

 

Tags : nashik, nashik news, Nashik Mumbai, Airlines service,