Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Nashik › नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार

नाशिकचा मुर्तुझा ट्रंकवाला महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:35PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकचा धडाडीचा सलामी फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला याची महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तसेच नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज गौरव काळेचीही पहिल्यांदाच संघात निवड झाली आहे.

दि. 22 ते 27 जानेवारीदरम्यान वडोदरा येथे महाराष्ट्र संघाची मुंबई, बडोदा, सौराष्ट्र व गुजरातविरुद्ध लढत होणार आहे. मागील वर्षी मुर्तुझाने बीसीसीआयच्या 23 वर्षांखालील सी. के. नायडू स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत चमकदार कामगिरी केली होती. एक शतक व एक द्विशतक झळकावले होते. तसेच मागील वर्षी रणजी पदार्पणातच शतक झळकावले होते.

यावर्षी सी. के. नायडू ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीविरुद्ध शतक झळकावले. तसेच  विदर्भ संघाविरुद्ध महाराष्ट्र संघाने विजय मिळविला. त्या सामन्यातही मुर्तुझाने नाबाद 49 धावा केल्या. यावर्षी मुर्तुझाची रणजी संघातही निवड झाली होती. मुर्तुझाच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याची पुनश्‍च महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. 

तसेच नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज गौरव काळे याने इन्व्हिटेशन लिगमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे संभाव्य संघात त्याची निवड झाल्यानंतर झालेल्या सामन्यांमध्ये सुद्धा गौरवने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे आता महाराष्ट्र संघात मुर्तुझासह गौरव काळे हे दोन नाशिककर आपली चमक दाखवतील. मुर्तुझा व गौरव यांची निवड झाल्यामुळे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी अभिनंदन केले.