Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Nashik › मोबाइल दुकान फोडणारी टोळी गजाआड

मोबाइल दुकान फोडणारी टोळी गजाआड

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 12:37AMनाशिक : प्रतिनिधी

देवळाली कॅम्प परिसरातील मोबाइल विक्रीचे दुकान फोडून मोबाइल चोरणार्‍या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीचे 90 मोबाइल आणि रिक्षा जप्त करण्यात आली आहेत. शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (23, रा. भगूर), फईम ऊर्फ बबन अश्पाक शेख (33, रा. भगूर रोड), सागर मुन्ना सोळंखी (30, रा. देवळाली कॅम्प) आणि निखिल विजय गलोत (रा. जुनी स्टेशनवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

मागील वर्षी देवळाली कॅम्प जुना बसस्टॉप परिसरातील मोबाइल विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाइल लंपास केले होते. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त रवींद्र नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार रवींद्र बागूल यांना संशयितांची माहिती मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांना सांगितले. त्यानुसार सापळा रचून देवळाली कॅम्प जुने बसस्टँडच्या आवारात संशयितांना पकडले. त्यांची चौकशी केल्यानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला.

चोरट्यांनी पाळत ठेवून दुकान फोडले होते. त्यानंतर चोरीचे मोबाइल विक्री केले. दरम्यान, पोलीस तपासात पोलिसांनी 90 मोबाइल, मोबाइल अ‍ॅक्सेसरीज आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, हवालदार संजय मुळक, शिपाई गणेश वडजे, स्वप्निल जुंद्रे, विशाल देवरे, दीपक जठार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.