Thu, Aug 22, 2019 10:37होमपेज › Nashik › आ. राहुल आहेर, सीमा हिरे यांचे राजीनामे

आ. राहुल आहेर, सीमा हिरे यांचे राजीनामे

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाकडे राजीनामे सुपूर्द केले. राजीनामा देणार्‍या आमदारांमध्ये चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांचा समावेश आहे.

दरम्यान, आमदारांनी त्यांचे राजीनामे आमच्याकडे न सोपविता ते विधानसभेच्या अध्यक्षांकडे सादर करावे, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. जिल्ह्यात राजीनाम्याचे सत्र सुरू झाले असून, देवळा व नाशिक तालुक्यातील काही सरपंचांनीही राजीनामे सादर केले आहे. राज्यमंत्री दादा भुसे यांनीही प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.सकल मराठा समाजातर्फे राज्यभरात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि.26) जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. दुपारी 12 वाजता डॉ. आहेर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षणाचा निर्णय होत नाही तो पर्यंत मेगाभरती थांबविण्यात यावी यासह विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी आ. आहेर यांच्यासमोर मांडल्या. तसेच आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहे. मात्र, प्रशासनाकडून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याची कैफियतदेखील पदाधिकार्‍यांनी आहेर यांच्यापुढे मांडली. दरम्यान, मी तुमचाच भाऊ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमचे कुटुंब हे समाजकारणाशी बांधील आहे. मराठा समाजामुळेच मला आमदार होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळेच वेळप्रसंगी प्राणाची आहुती द्यायची तयारी आहे, असे सांगतानाच आहेर कुटुंबीयांनी आजपर्यंत दिलेला शब्द कधीही फिरवला नसल्याचे आ. आहेर म्हणाले.  दरम्यान, समाजातील पदाधिकार्‍यांकडे राजीनामा सुपूर्द केला. समाजाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्यांनी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवावा, असेही आहेर यांनी स्पष्ट केले.

नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. सिडकोतील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी हा राजीनामा दिला. दरम्यान, त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, म्हणून आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे हिरे यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केले आहे. समाजाच्या भल्यासाठी आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याचे स्वागतच आहे. परंतु, खरंच समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी अपेक्षा असेल तर आमदारांनी त्यांचे राजीनामे समितीकडे सादर न करता थेट विधानसभा अध्यक्षांकडे पाठवावे, असे करण गायकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, औरंगाबादमधील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून विधानसभेच्या अध्यक्षांकडे थेट राजीनामा पाठविला. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आ. आहेर आणि आ. हिरे त्यांचे राजीनामे अध्यक्षांकडे देणार का याबाबत आता चर्चा रंगली आहे.