Tue, Jul 16, 2019 09:52होमपेज › Nashik › दगाफटका टाळण्यासाठी धावपळ

दगाफटका टाळण्यासाठी धावपळ

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात विधान परिषदेसाठी सोमवारी (दि. 21) शांततेत मतदान पार पडले असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना व भाजपाला धावपळ करावी लागली. दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मतदान पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडले होते. दरम्यान, दोन्ही पक्षांना दगाफटका टाळण्यात किती यश आले, हे येत्या गुरुवारी (दि.24) निकालानंतर स्पष्ट होईल.

मुळातच जिल्ह्यातील पंधराही मतदान केंद्रांवर दुपारी 12 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी केवळ 18 इतकी होती. मात्र, दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे हे कार्यकर्त्यांसह सकाळपासून हजर होते. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी सकाळी दहालाच जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्राला भेट दिली. मतदानाच्या दृष्टीने यावेळी त्यांनी सहाणेंना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. याप्रसंगी आमदार जयंत जाधव हेही उपस्थित होते.  

दुपारी 12 वाजता भाजपाचे नगरसेवक बसने प्रथम दाखल झाले. नगरसेवकांनी बसमधून उतरून थेट मतदान केंद्राचा रस्ता धरला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी भाजपा नगरसेविकांची दुसरी बस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप व ज्येष्ठ नेते विजय साने यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवत सदस्यांना मतदान केंद्राकडे रवाना केले. 

भाजपाच्या पाठोपाठच सेनेचे महापालिकेतील महिला व पुरुष सदस्य हे दोन वेगवेगळ्या बसमधून मतदान केंद्रावर हजर झाले. पुरुष सदस्यांच्या बसमध्ये स्वतः नरेंद्र दराडे यांच्यासह पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हेही उपस्थित होते. बसमधून उतरताच सेनेच्या कार्यकर्त्यांनी सदस्यांभोवती गराडा घातला. सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे भगूर नगरपालिकेतील सदस्यांना एकत्रित घेऊन आले. करंजकरांच्या या एन्ट्रीची चर्चा मात्र यावेळी चांगलीच रंगली. दरम्यान, मतदानावेळी फाटाफूट रोेखण्यासाठी भाजपा-सेनेने सर्वतोपरी उपाययोजना केली. परंतु, त्याचा फायदा किती प्रमाणात होईल, हे येत्या गुरुवारीच स्पष्ट होईल.