Tue, Jul 16, 2019 13:36होमपेज › Nashik › फाटाफुटीच्या राजकारणात कोण ठरणार बाजीगर?

नाशिक : फाटाफुटीच्या राजकारणात कोण ठरणार बाजीगर?

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 22 2018 1:28AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या आखाड्यात ऐनवेळी भाजपाने राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या पाठीशी उभे राहत मित्रपक्ष शिवसेनेला खिंडीत गाठले. तर दुसरीकडे भाजपाच्या या चालीनंतरही शिवसेनेने निवडणूक प्रतिष्ठेची करत विजयाचा दावा केला आहे. असे असले तरी कास्ट फॅक्टर आणि मनी पॉवर या दोन बाबींमुळे मतदारांची फाटाफूट करून या निवडणुकीच्या स्पर्धेत कोण बाजीगर ठरतो हे 24 तारखेला उघड होणार आहे. 

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सोमवारी राज्यात मतदान पार पडले. मात्र, या सहाही जागांमध्ये खर्‍याअर्थाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले ते नाशिकच्या निवडणुकीने. त्याला कारणही तसेच आहे. शिवसेनेने पालघरमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेला शह पाहता त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपाने ऐनवेळेस आपल्या 167 मतांचे दान आघाडीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला. बर हा निर्णय घेण्यासाठी देखील भजापाला आठ दहा दिवसांचा कालावधी लागला. म्हणजेच हा निर्णय घेताना भाजपाचेही कुठेतरी पाणी मुरतच होते असे म्हणायला काही हरकत नाही. भाजपाच्या अशा चाचपणीमुळे त्यांच्या नगरसेवकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले होते.

आता एका रात्रीतून घेतलेल्या निर्णयातून आपल्या मतदारांमधील संभ्रम दूर करण्यात भाजपाला यश येते की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल. नाशिक विधान परिषद निवडणुकीत दोन घटक महत्वाचे ठरले. एक म्हणजे कास्ट फॅक्टर आणि दुसरा म्हणजे मनी पॉवर. यात बाजी मारणारा विधान परिषदेचा दावेदार असू शकतो.

पक्षाचे आणि मित्र पक्षाचे हमखास असणारे मत पक्षाच्या उमेदवाराला पडेलच याचा काही भरवसा या निवडणुकीपुरता तरी देता येणार नाही. कारण दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी काहीही करा पण निवडणूक जिंका असा कानमंत्र बैठकांमध्ये दिला आहे. प्रतिस्पर्धी पक्षाच्या मतदारांना फोडा, मित्रांना जोडा असा संदेश दिल्याने उमेदवारांनी जीवाचे रान करून मतदारांची फोडाफोड केली असणार यात काही शंकाच नाही. शिवसेना आणि भाजपा युती असलेले हे दोन्ही विधान परिषदेच्या निमित्ताने स्वबळावर आपली परीक्षा आजमावत आहेत. यामुळे या निवडणुका दोन्ही पक्षांच्या दृष्टीने आगामी निवडणुकीची राजकीय समिकरणेच मांडण्यास पुरी ठरणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि ना. दादा भुसे यांनी नाशिकला तळ ठोकला होता.

आपल्या उमेदवारासाठी दोन वेळा बैठक घेऊनही त्याला अनेक नगरसेवकांनी दांडी मारत आपली नाराजी व्यक्‍त केली होती. यामुळे शिवसेनेतील या दुसर्‍या नाराज गटाने मतदान करताना कायकेले असेल हे वेगळे सांगायला नको. तर दुसरीकडे भाजपाने आदल्या दिवशी आपली भूमिका जाहीर करत सर्वांनाच संभ्रमात पाडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपासाठी शेवटपर्यंत मुंबईतून पालकमंत्री गिरीश महाजन यांना यायला वेळ मिळाला नाही. भाजपाच्या भूमिकेमुळे नाराज झालेले अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनी त्यांच्या हक्‍काची असलेली मते कदाचित शिवसेनेच्या उमेदवाराकडे फिरवली असतील किंबहुना तशी सहानुभूती सेनेच्या उमेदवाराविषयी दाखवली असणार यात शंकाच नाही. मला नाही तर दुसर्‍याला नाही या भावनेने कोकणी यांनी असे केले असेल तर ते आघाडीच्या उमेदवारासाठी त्रासदायक ठरू शकते.