Sat, Apr 20, 2019 18:46होमपेज › Nashik › निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलची सरशी 

निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलची सरशी 

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 12:06AMनाशिक : प्रतिनिधी 

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि उद्योग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन अर्थात निमा निवडणुकीच्या कार्यकारिणीच्या 11 जागांवर सत्ताधारी एकता पॅनलने रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार (बॅनर्जी-खरोटे गट) विजयी झाले आहे. तर उद्योग विकास पॅनलला 7 तर  एकता पॅनलला  ( राठी-नहार गट ) 2 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा सत्ताधारी गटाला कौल दिला आहे. तर रात्री उशिरापर्यंत सिन्नर पदाधिकारी व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीपदाची मतमोजणी सुरू होती.  

मतमोजणीसाठी 25 टेबल मांडण्यात आले होते. प्रारंभी 25 मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले. सकाळी 11 च्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या मतांची मोजणी करण्यात मोठा कालावधी जाणार असल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला काहीसा उशीर झाला.

दरम्यान,  रविवारी (दि.29) झालेल्या मतदानात  2,965  पैकी 1,792 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला असून, 60.44 टक्के मतदान झाले. दरम्यान, मतदानाला काहीसा विलंब होत असल्यामुळे काही मतदार संतप्त झाले होते. सिन्‍नरहून सर्वाधिक 80 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे सिन्नर या निवडणुकीत खर्‍या अर्थाने किंगमेकर ठरला आहे. निवडणूक समितीचे अध्यक्ष व्ही. के. भुतानी व सहायक म्हणून विवेक गोगटे आणि नंदू अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया राबविली.  

रविवारी झालेल्या मतदानानंतर सोमवारी मतमोजणीलाही उमेदवार व पॅनलच्या समर्थकांनी गर्दी केली होती. पॅनलच्या कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे बघण्यासाठी  दुपारनंतर गर्दीत मोठी वाढ झाली. सायंकाळी सभासदांच्या वाहनांमुळे वाहतुकीला काही वेळ अडथळा निर्माण झाला होता. 

कार्यकारिणीपदासाठीचे विजयी उमेदवार

एकता पॅनल (बॅनर्जी- खरोटे गट) - हर्षद ब्राह्मणकर, तेजपाल बोरा, गौरव धारकर, राजेश    गडाख, संदीप सोनार, भाग्यश्री शिर्के, श्रीकांत बच्छाव, अखिल राठी, मनीष रावळ, बाळासाहेब हासे, करणसिंग पाटील, भरत येवला. उद्योग विकास पॅनल - संजय महाजन, एन. डी. ठाकरे, कमलेश नारंग, प्रदीप पेशकार, कैलास अहिरे, उदय रकिबे. 
एकता पॅनल (राठी-नहार  गट)-  निखिल पांचाळ, नीलिमा पाटील.

मतपत्रिकेतून मतदाराची नाराजी 

उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मतदानाचे आवाहन करणारे एसएमएस केल्यामुळे एका मतपत्रिकेतून मतदाराने उमेदवारांविषयी थेट मतपत्रिकेतून  नाराजी व्यक्त केली. उमेदवारांची संख्या 96 असल्याने गेल्या आठ दिवसांपासून मतदारांना दररोज कमीत कमी 96 एसएमएस येत होते. त्यामुळे एका उमेदवाराने मतपत्रिकेवर एसएमएस आणि व्हॉट्सअ‍ॅपवर उमेदवारांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. पुढील वेळेस उमेदवारांना मतदारांचे मोबाइल क्रमांक देऊ नयेत, अशा आशयाचा मजकूर लिहिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात आले.