Mon, May 27, 2019 09:59होमपेज › Nashik › महासभेत आमदारांवरून रंगला खेळ!

महासभेत आमदारांवरून रंगला खेळ!

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 03 2018 11:59PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

पंचवटीत महिला उद्योग भवन उभारण्यावरून महासभेत काही काळ तणाव निर्माण झाला. उद्योग भवनासाठी आमदार बाळासाहेब सानप यांची सूचना असल्याचे समोर येताच  इतर मतदारसंघातील आमदार कार्यक्षम नाहीत का असा प्रश्‍न विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केला. त्यावरून सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी असा वाद वाढीस लागला आणि बराच काळ राजकारणाचा खेळ रंगत माजी आमदार वसंत गिते यांच्यापर्यंत येऊन पोहोचला.

पंचवटी विभागातील प्रभाग 3 मध्ये मार्केट व पार्किंग यासाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी 5260 चौ. मी. जागा मनपाच्यात ताब्यात आहे. या जागेवर महिला व बालकल्याण विभागाच्या राखीव निधीतून 10 कोटी 25 लाख रुपये खर्च करून महिला उद्योग भवन उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला. त्यावर महिला बालकल्याण समितीच्या सदस्या समिना मेनन यांनी महिला बालकल्याणच्या राखीव निधीतून उद्योग भवनचे काम करण्यास आक्षेप घेत आमदार निधीतून संबंधित बांधकाम करण्याची मागणी केली. त्यावर भाजपाचे नगरसेवक रूची कुंभारकर व जगदीश पाटील यांनी आमदारांचे नाव घेवून राजकारण करू नका.

महिलांसाठी उभारण्यात येत असलेल्या कामावर आक्षेप घेण्याची गरज काय, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर प्रस्तावात आमदार बाळासाहेब सानप यांनीच त्यासाठी सूचना केली असल्याची बाब मेनन यांनी निदर्शनास आणून दिली. महिला बालकल्याणसाठी निधीची कमतरता असल्याने आमदारांच्या निधीतून उद्योग भवन उभारावे, अशी करत पंचवटीप्रमाणेच इतरही विभागात उद्योग भवन साकारण्याची मागणी केली. मेनन यांनी उघड केलेल्या माहितीचा आधार घेत विरोधी पक्षाचे गटनेते गजानन शेलार, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, पश्‍चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी मध्य आणि पश्‍चिम मतदारसंघाच्या आमदार विकासकामे करताना कमी पडत आहे का, की ते कार्यक्षम नाहीत अशी टीका टिप्पणी करत सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

मध्यच्या आमदार प्रा. देवयांनी फरांदे कार्यक्षम असल्याने पंचवटीप्रमाणेच इतर विभागातही महिला उद्योग भवन उभारण्यासाठी त्यांच्याकडे जाण्यासाठी उपमहापौर प्रथमेश गिते यांना सोबत घेवू, अशी सूचना केली. गिते-फरांदे वाद सर्वश्रृत असल्याने डॉ. पाटील यांच्या वक्तव्याने सभागृहात हंशा पिकला तर गिते यांनी व्यासपीठावरूनच हात जोडले. महिला रुग्णालय उभारण्याच्या विषयावरून दोन आजी-माजी आमदारांमधील वाद सुरू असल्याने या विषयाचा फुटबॉल झाल्याची आठवणही यावेळी विरोधकांनी करून देत सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.