Thu, Jul 16, 2020 07:56होमपेज › Nashik › ‘डस्टबिन’ खरेदीच्या चौकशीचे आदेश 

‘डस्टबिन’ खरेदीच्या चौकशीचे आदेश 

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:05AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

वादग्रस्त ‘डस्टबिन’ खरेदीची चौकशी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. मात्र, या प्रकरणाची चौकशी कुणामार्फत करणार याविषयी स्पष्टता केली नाही. यामुळे या विषयाबाबत साशंकताच राहिली आहे. महासभेची प्रशासकीय मान्यता न घेताच प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या कामांचादेखील अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.  महासभेचे कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी अंगात डस्टबिनचे चित्र असलेले फलक घालून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. स्वच्छ भारत अभियानाच्या निधीचा दुरूपयोग करत झालेल्या डस्टबिन खरेदीबाबतचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी उपस्थित केला. धोरणात्मक निर्णय असूनही महासभेची मंजुरी न घेताच प्रशासनाने अशा प्रकारची खरेदी करून महासभेचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला असून, या खरेदीत 15 टक्के ओव्हरहेड चार्जेस कशासाठी लावण्यात आले असा प्रश्‍न उपस्थित केला.

प्रशासकीय मंजुरी न घेताच खरेदी होत असेल तर प्रभाग समित्या आणि महासभा घेण्याचे प्रयोजन काय? अशा प्रकारे गेल्या वर्षभरात आणि त्याहीपूर्वी झालेली विकासकामे आणि खरेदीबाबतची माहिती प्रशासनाकडून घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली. तसेच डस्टबिन खरेदीची चौकशी करून त्याचा खर्च संबंधित अधिकार्‍यांच्या वेतनातून वसूल करण्यात यावा, अशी सूचना गुरुमित बग्गा, डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, शाहू खैरे, भागवत आरोटे, विलास शिंदे, गजानन शेलार, संभाजी मोरुस्कर, शशिकांत जाधव, सुदाम डेमसे यांनी केली. यावेळी बग्गा यांनी विकासकामे आणि खरेदीबाबत महासभेचे आणि आयुक्तांचे अधिकार काय याबाबतचा जाब विचारला. त्यात महापालिकेच्या मान्यतेशिवाय खरेदी वा कामे करता येत नसल्याची माहिती समोर येताच गेल्या पाच वर्षांत या प्रकारे प्रशासनाने किती कामे केली याबाबतची माहिती देण्याची मागणी केली.

महासभेत प्रस्ताव सादर करून खरेदी करता आली असती. तसेच डस्टबिन खरेदीची गरजच नव्हती, असे भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी सांगत खरेदीची सखोल चौकशीची सूचना केली. प्रशासकीय मान्यता न घेता करण्यात आलेल्या कामांची चौकशी लेखापरीक्षक तुषार पगार यांच्यामार्फत करण्याची सूचना दिनकर पाटील यांनी करत डस्टबिन खरेदीची सखोल चौकशीची सूचना केली. त्यावर महापौर भानसी यांनी डस्टबिन खरेदीचा अहवाल सादर करून प्रशासकीय मान्यता न घेता केलेल्या विकासकामांचीही माहिती सादर करण्याचे आदेश दिले.