Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मी आलो ‘स्वागताला पण तुम्हीच नव्हते

मी आलो ‘स्वागताला पण तुम्हीच नव्हते

Published On: Feb 21 2018 11:16PM | Last Updated: Feb 21 2018 10:52PMनाशिक : प्रतिनिधी

मी आलो होतो स्वागताला पण, तुम्ही भेटले नाही... मला कोणालाही निलंबित करण्याची अजिबात इच्छा नाही...गतिमान काम करा...कसलीही अपेक्षा ठेऊ नका, अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कर्मचार्‍यांशी  बुधवारी (दि.21) संवाद साधला. वक्तव्य उपरोधिक असले तरी कर्मचार्‍यांना आपल्या कार्यपद्धतीची दिशाच त्यांनी स्पष्ट करून दिली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली होताच तत्काळ पदभार स्वीकारणारे गिते दुसर्‍याच दिवसापासून रजेवर गेले होते. रजा संपवून मंगळवारपासून  त्यांनी पुन्हा कामकाजाला सुरूवात केली. रजेनंतरच्या पहिल्याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली आणि सायंकाळी 5 वाजता पुन्हा जिल्हा परिषदेत परतलेही. त्यानंतर सर्वच खातेप्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रलंबित फायली निकाली काढण्यासाठी सूचना करतानाच फायलींवर सुस्पष्ट अभिप्राय लिहिण्याचे आदेश खातेप्रमुखांना देण्यात आले.

दुसर्‍या दिवसापासून म्हणजे बुधवारपासून गिते यांनी नियमित कामकाजाला सुरूवात केली. सकाळी त्यांनी काही विभागांना भेटी दिल्या, तेव्हा बरेचसे कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर नसल्याचे निदर्शनास आले. काही वेळानंतर कर्मचारी दाखल झाले आणि गिते यांना बघून ते भांबावलेही. यावर गिते यांनी मी आलो होतो स्वागताला पण, तुम्ही नव्हते, अशा उपरोधिक भाषेत कर्मचार्‍यांशी संवाद साधला. गिते यांच्या वक्तव्याने कर्मचारी काही वेळ गोंधळले. त्यानंतर गिते यांनी संवाद साधण्याच्या ओघात आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट करून दिली. कोणतीही फाईल टेबलावर पडून राहणार नाही यासाठी गतिमान कामकाज करा, अशी सूचनाही कर्मचार्‍यांना करण्यात आली.

कोणतीही अपेक्षा न ठेवता कामकाज करा, कोणालाही निलंबित करण्याची अजिबात इच्छा नाही, हेही त्यांनी स्पष्ट करून दिले. गिते यांच्या धावत्या संवादाने कर्मचार्‍यांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले.

अंगणवाडी कर्मचार्‍यांची निदर्शने

 प्रलंबित मानधनासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला. जून 2017 पासून पीएफएमएस प्रणालीमार्फत अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन दिले आहेत. जिल्ह्यातील 500 कर्मचार्‍यांना तेव्हापासून मानधन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

कर्मचार्‍यांना पूर्वीच्याच पद्धतीने मानधन देण्याचे सरकारचे आदेश असताना या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप संघाने केला. तसेच, ज्या कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आली त्यांना एकरकमी लाभ देण्यात यावा, योजनेच्या कामासाठी लागणार्‍या नोंदवह्या आणि अर्ज देण्यात यावेत, तक्रार असलेल्या मुख्यसेविकांवर तत्काळ कारवाई करावी आदी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली.