Sat, Feb 16, 2019 16:46होमपेज › Nashik › केरळ पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात

केरळ पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 10:57PMनाशिक : प्रतिनिधी

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नाशिक जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी एक दिवसाचा पगार देणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून केल्या जाणार्‍या या मदतीमुळे प्रशासनातील माणुसकीचे दर्शन घडणार आहे. 

केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून, 14 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसात आतापर्यंत 324 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर दोन लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे केरळचे तब्बल आठ हजार 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमधून केरळला सावरण्यासाठी केंद्र व देशातील विविध राज्य सरकारांनी मदत देऊ केली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, एनजीओदेखील यात पुढाकार घेत आहेत. दरम्यान, आता या कामी नाशिक जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे. 

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केरळवासीयांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून  एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन अधिकारी-कर्मचार्‍यांना केले आहे. महसूल विभागाचे जिल्ह्यात एक हजार 674 अधिकारी-कर्मचारी आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला साद देत नाशिक प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाने तातडीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पत्र देत मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. 

सर्व तालुका आणि प्रांताधिकारी कार्यालयांना मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही रक्कम एकत्रित जमा केल्यानंतर केरळ सरकारने मदतीसाठी सुरू केलेल्या केरळ फ्लड रिलिफ फंड या बँक खात्यात ती राशी जमा केली जाईल, अशी माहिती खेडकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्हा प्रशासनाच्या या कार्याचा आदर्श घेण्याची गरज आहे, असे झाल्यास पुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळाला संकटावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याची चेतना नक्कीच मिळेल.