होमपेज › Nashik › अखेर मीना यांची उचलबांगडी

अखेर मीना यांची उचलबांगडी

Published On: Feb 06 2018 1:48AM | Last Updated: Feb 06 2018 12:52AMनाशिक : प्रतिनिधी

वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे खातेप्रमुखांसह लोकप्रतिनिधींची ओढवून घेतलेली नाराजी तसेच ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे वादग्रस्त बनलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांची अवघ्या नऊ महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली आहे.  मीरा भाईंदर महापालिकेचे सहआयुक्त डॉ. नरेश गिते यांची नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत कार्यभार स्वीकारल्याच्या  पहिल्याच दिवसापासून मीना यांची कार्यपद्धती खातेप्रमुख-कर्मचारी  तसेच जिल्हा परिषद सदस्य-पदाधिकारी यांना खटकणारी ठरली. क्षुल्लक कारणांवरून खातेप्रमुखांवर नोटिसांचा पाडलेला  पाऊस मीना यांच्याविरोधात तीव्र असंतोष निर्माण करणारा ठरला. फायलींवर मारले जाणारे चर्चा करण्याचे शेरे फायलींचा प्रवास लांबविणारे ठरले. ग्रामसेवक संघटनेने मीना यांच्या कार्यपद्धतीविरोधात असहकार आंदोलन पुकारून त्यांच्या बदलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.

या आंदोलनाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळालाच शिवाय मीना यांच्या बदलीसाठी दहा आमदार, वीसहून अधिक सदस्यांनी पत्र दिले होते. आंदोलनादरम्यान मीना यांच्या समर्थनार्थ आदिवासी संघटनेचा काढण्यात आलेला मोर्चा आणि या मोर्चात काही लोकप्रतिनिधींचा असलेला सहभाग थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला होता. विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत असमाधानकारक कामकाजावरून कडक ताशेरे ओढले होते.

एकूणच सार्‍यांचाच रोष ओढवून घेणार्‍या मीना यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी गिते यांची बदली झाली आहे. गिते हे मीरा भाईंदर महापालिकेचे सहआयुक्त असून, यापूर्वी त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे. अवघ्या नऊ महिन्यांतच मीना यांची बदली झाली.