Fri, May 24, 2019 08:33होमपेज › Nashik › अब दिल्ली दूर नही..!

अब दिल्ली दूर नही..!

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:29PMधनंजय बोडके

द्योगिक, कृषी उत्पादने आणि धार्मिक शहर म्हणून नाशिकचे नाव जगभरात  प्रसिद्ध आहे. सात ते आठ जिल्ह्याच्या द‍ृष्टीने नाशिक हे मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे विमानसेवा अनेक घटकांसाठी महत्त्वपूर्ण  आहे.  नाशिकचे लोकप्रतिनिधी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, डॉक्टर्स, वकिलांसह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या नाशिक-दिल्ली विमानसेवेची अनेक दिवसांपासून मागणी केली होती. त्यामुळे आता ही सेवा सुरू  झाल्यानंतर या सर्व घटकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुरू केलेल्या ओझर एअरपोर्टनंतर विमानसेवा सुरू करण्यासाठी  खासदार हेमंत गोडसे यांनी सुरुवातीपासूनच या सेवेसाठी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला खर्‍या अर्थाने यश मिळाले आहे. 

प्रवाशांच्या सोयीबरोबरच नाशिकचा शेतमालही देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचणार आहे. नाशिकला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवारी  अशी तीन दिवस  नाशिकहून दिल्लीसाठी विमान सेवा राहणार आहे. विमानसेवेमुळे देश आणि विदेशात कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा झाला आहे. जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी, तर नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील प्रवाशांचे सहकार्य लाभले तर या सेवेचा विस्तारदेखील करणार असल्याचे स्पष्ट केले. तर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी एअरकनेक्टिव्हिटी महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा प्रशासनाकडून विमानसेवेसाठी आवश्यक सर्व ती मदत केली जाणार असल्याचे सांगितले.

 नाशिकच्या ओझर विमानतळाहून प्रथमच एअर डेक्‍कनच्या बोइंग विमानाद्वारे सेवा देण्यात येत आहे. जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवा मिळणार आहे. भारतीय प्रवासी, प्रादेशिक व उदयोन्मुख शहरे जोडण्यासाठी व वनस्टॉप निवडीसाठी अनेक पर्याय, सोय व कनेक्टिव्हिटी देणार असून, त्यांना प्रगतीच्या द‍ृष्टीने नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे. प्रवाशांना या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करत असताना सर्वोत्तम इन फ्लाइट उत्पादने व सेवेचा लाभ घेता येणार आहे.  

एअर कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या विकासात भर पडणार आहे. दिल्लीसह इतर ठिकाणांहून पर्यटक, उद्योजक, व्यापारी नाशिकमध्ये आल्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून एअर जेटवेजला आवश्यक ते सहकार्य देणार आहे. नाशिकहून दिल्लीसाठी प्रथम मुंबई आणि नंतर दिल्लीला जावे लागायचे. परंतु, आता नाशिकहून थेट दिल्लीला विमानाने जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 

‘उडान’अंतर्गत 2890 रुपये तिकीट 

स जेट एअरवेजचे बोइंग 737 या विमानाद्वारे दिल्लीसाठी सेवेस प्रारंभ झाला आहे. या विमानाची आसन क्षमता 168 आहे. यातील 40 आसने ही उडान योजनेंतर्गत राखीव आहेत. नाशिकहून दिल्लीप्रवासासाठी दर सर्व करांसहित 2890 रुपये आहेत. तर 40 तिकिटानंतरच्या  150 इकॉनॉमी क्‍लासची आसने असतील त्यासाठी प्रवाशांना 4658 रुपये, तर 12 आसने बिझनेस क्‍लासची असूून, त्यासाठी  18,693 रुपये द्यावे लागणार आहे.

शेतमालाला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ 

स नाशिक हे द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर कांदा आणि डाळिंबांचे देखील मोठे उत्पादन जिल्ह्यात होते. त्यामुळे 168 आसनी विमानामुळे नाशिक व नवी दिल्ली दरम्यान कार्गो क्षमताही वाढेल. आणि प्रत्येक विमानसेवेदरम्यान 2500 किलो म्हणजे दर आठवड्याला 7500 किलो शेतमाल आणि फळे वाहतूकही शक्य झाली आहे. यामुळे निर्यातदारांना आता दिल्लीमार्गे माल पाठविण्याची सुविधा मिळाली आहे. फळे व भाज्या, मशरूम, ऑटोमोटिव्ह स्पेअर्स, इंजिनिअरिंग गुड्स, मशीनचे लहान भागसुद्धा या विमानसेवेतून घेतले जाणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर बाजूच्या जळगाव जिल्ह्यात केळीचे विक्रमी उत्पन्‍न होते. केळी आणि केळीपासून तयार झालेले उत्पादने देखील या विमानसेवेद्वारे विदेशात पाठविले जाणार आहेत.