Tue, Apr 23, 2019 22:17होमपेज › Nashik › हजार अपघाती मृत्यूंचा तपास अद्याप अंधारात

हजार अपघाती मृत्यूंचा तपास अद्याप अंधारात

Published On: Jan 14 2018 2:22AM | Last Updated: Jan 14 2018 2:18AM

बुकमार्क करा
नाशिक : गौरव अहिरे

नाशिक जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जानेवारी 2010 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत अपघातात पाच हजार 548 व्यक्‍तींचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक हजार 49 अपघाती मृत्यूंना कारणीभूत कोण होते, हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या अपघातांना जबाबदार असलेल्या बेदरकार वाहनचालकांना शोधण्याचे आव्हान नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर आहे.  जिल्ह्याचा वाढता विस्तार, दळणवळणाची व्यवस्था, वाहनांची वाढती संख्या यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे.

त्यात अपघातांची भीषणता वाढत गेल्याने अपघातानंतर जागेवरच मृत्यू होणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जानेवारी 2010 पासून दरवर्षी सरासरी 693 लोकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. यात आबालवृद्धांचा सहभाग असल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, तर काहींच्या कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. गत आठ वर्षांत जिल्ह्यात विविध ठिकाणी साडेपाच हजारांहून अधिक लोकांना अपघातात जीव गमवावा लागला. त्यातील चार हजार 499 अपघातांत कारणीभूत असलेल्या वाहनचालकांचा तपास लागलेला आहे. मात्र, एक हजार 49 अपघातांना कारणीभूत असलेल्या चालकांचा शोध अद्याप न लागल्याने या अपघातांचा तपास अद्याप अंधारात आहे.