Mon, May 20, 2019 18:17होमपेज › Nashik › नाशिक - पुणे मार्गावरील तब्बल ६६ बसफेर्‍या रद्द

नाशिक - पुणे मार्गावरील तब्बल ६६ बसफेर्‍या रद्द

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 31 2018 12:10AMनाशिक : प्रतिनिधी 

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला चाकण येथे हिंसक वळण लागून समाजकंटकांनी नाशिक-पुणे महामार्गावर तोडफोड करून जाळपोळ केली. त्यात एसटीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे जाणार्‍या शिवशाहीच्या 66 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. ज्या बसेस या मार्गावर धावत होत्या, त्या जवळच्या डेपोमध्ये थांबविण्यात आल्या. तसेच, नाशिक विभागातील काही बसेसची तोडफोड झाल्याचे समजते.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी शांततेत तर काही ठिकाणी बंदला गालबोट लागले. समाजकंटकांकडून एसटी बसेसला टार्गेट केले जात आहे. सोमवारी पुणे बंदची हाक देण्यात आली होती. चाकण येथे बंदला हिंसक वळण लागले. त्याचा परिणाम नाशिक-पुणे मार्गावरील वाहतुकीवर झाला. समाजकंटकांनी एसटी व इतर प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नाशिकहून पुण्याकडे जाणार्‍या शिवशाही बसेसची वाहतूक थांबविण्यात आली होती. शिवशाहीच्या दिवसभरातील तब्बल 66 फेर्‍या रद्द करण्यात आल्या. पुण्याकडे निघालेल्या बसेस आहे तेथेच थांबवून त्यांना जवळच्या डेपोमध्ये नेण्यात आले. त्यामुळे नाशिकहून पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांची मोठी कोंडी झाली. प्रवासी अडकून पडले होते.