Thu, Jul 18, 2019 20:51होमपेज › Nashik › शिवसेनेने भाजपासह काँग्रेस, मनसेला चारली धूळ

शिवसेनेने भाजपासह काँग्रेस, मनसेला चारली धूळ

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:41PMनाशिक : संदीप दुनबळे

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात नरेंद्र दराडे यांना निवडून आणत शिवसेनेने एकाच वेळी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी  आणि मनसे या चारही प्रमुख पक्षांना धूळ चारली. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले. जात फॅक्टरचा निर्माण केला गेलेला आभास अन् राजकीय डावपेच कुचकामी ठरत लक्ष्मीदर्शनच यशस्वी ठरले.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असली तरी राजकीय पक्षांनी या निवडणुकीला चक्‍क विधानसभेचे स्वरूप दिले. राज्यातील सत्तेत भाजपाबरोबर सेना सहभागी असली तरी सेनेने नेहमीच घेतलेली भाजपाविरोधी भूमिका या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात दिसून आली. अर्थात, सेनेने आधीच स्वबळाचा नारा देऊन उमेदवार जाहीर केलेला असतानाही राज्यातील विधान परिषदेच्या सहापैकी तीन-तीन जागा सेना आणि भाजपाने वाटून घेतल्या होत्या. पण, पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना सेनेने उमेदवारी दिल्याने युतीतील संबंध ताणले गेले. अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत भाजपाकडून सेनेची मनधरणी सुरू होती.

कारण, भाजपाचे केंद्रातील संख्याबळ कमी झाल्याने पालघरसह गोंदिया-भंडारा या दोन्ही जागा जिंकणे या पक्षासाठी महत्वाचे ठरले. सेनेने मात्र पालघर मतदारसंघात उमेदवार कायम ठेवल्याने संतापलेल्या भाजपाने  त्याचा वचपा काढण्यासाठी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सेनेविरोधात उघड भूमिका घेत थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा निर्णय घेतला. मतदानाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीला मतदान करण्याचा निरोप धाडण्यात आला खरा पण, भाजपेयींनी तो साफ धुडकावला.

राष्ट्रवादीला आधीच काँग्रेस आणि मनसेचाही पाठिंबा होता. त्यात भाजपाचीही भर पडल्याने सेना विरोधात सारेच प्रमुख राजकीय पक्ष, असे चित्र निर्माण झाले होते. विशेेष म्हणजे, सेनेने पालघर मतदारसंघात घेतलेली भूमिका मुख्यमंत्र्यांच्या इतकी जिव्हारी लागली की, थेट त्यांनीच या निवडणुकीत लक्ष घातले. म्हणजे, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय सेनेला धडा शिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाचाच होता. दुसरीकडे राष्ट्रवादीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी विधान परिषदेच्या जागा जिंकणे महत्वाचे होते. त्यामुळेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनीच नाशिकमध्ये मुक्काम करून निवडणुकीची सूत्रे हाती घेतली होती. 

अर्थात, दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ पावणे दोनशे इतकेही नसल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विरोधकांची मते फोडण्याशिवाय पर्याय नव्हता. पवार यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड हेही नाशिकमध्ये येऊन गेले. पाटील आले तेव्हा भाजपाच्या काही पदाधिकार्‍यांनी पाटील यांच्यासोबत स्नेहभोजनालाही हजेरी लावली होती. तसेच या निवडणुकीतून मराठा मतदारांची मोट बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. शरीराने भाजपात पण मनाने राष्ट्रवादीत असलेले आमदार अपूर्व हिरे हेही राष्ट्रवादीच्या पाठीशी फारशी ताकद उभी करू शकले नाही. निवडणुकीच्या धामधुमीतच माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांची जामिनावर सुटका झाल्याने ती राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू ठरली होती. डाव -प्रतिडाव टाकण्यात तरबेज असलेले  भुजबळ प्रत्यक्ष  रिंगणात उतरून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय लिलया खेचून आणतील, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मात्र प्रकृती ठिक नसल्याने भुजबळांचा मुक्काम रूग्णालयात होता. 

या सार्‍या राजकीय घडामोडीत सेनेकडे हक्काचे 211 मते असल्याने या पक्षाच्या उमेदवाराचाही भर  विरोधकांची मते तोडफोडीवरच राहिला. राजकीय डावपेचांपेक्षा लक्ष्मीदर्शनाकडे कल दिसून आला. लक्ष्मीदर्शनाने डोळे दीपल्याने मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावत भाजपाच्या मतदारांनी सेनेला मदत केल्याचे उघड झाले. सेना उमेदवाराच्या विजयासाठी हीच जमेची बाजू ठरली. याशिवाय वर्षभरापासून मतदारांशी वैयक्तिक गाठीभेटी हेही विजयाचे वैशिष्ट्य ठरले.  

मालेगाव महापालिकेतील मतदारांना सेनेकडे वळविण्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि परवेझ कोकणी यांची भूमिका महत्वाची ठरली. कोकणी यांना पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यात भाजपाने धन्यता मानल्याने कोकणी यांची नाराजीही राष्ट्रवादीला भोवली. मुस्लिम समाजाची मते सेनेकडे वळविण्यात त्यांचाही हातभार लागला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भर त्या-त्या पक्षनेत्यांवरच राहिल्याने आणि मतदारांना साधी विचारणाही न झाल्याने तेच पराभवाचे कारण ठरले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सुरूवातीपासून लावलेली ‘मराठा कार्ड’ची टूम अंगलट आली.  म्हणजे, या निवडणुकीत बाजी मारून सेनेने भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या चारही पक्षांना धूळ चारली. तर सेनेला धूळ चारण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा धुळीला मिळाली. दुसरीकडे अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची रणनीतीही फुसका बार ठरली.