Mon, Jun 24, 2019 17:09होमपेज › Nashik › आसनाची दिशा बदलली; बँकेची दशा बदलणार?

आसनाची दिशा बदलली; बँकेची दशा बदलणार?

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 11:02PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खुर्ची जाता-जाता वाचल्याने केदा आहेर यांनी आधी दालनातील आसन बदलल्यानंतर आता या आसनाची दिशा बदलली आहे. खुर्चीचे महत्त्व काही दिवसातच उमगलेले आहेर हे खरोखरच बँकेची दशा बदलण्यास यशस्वी ठरतील काय, हे मात्र येणारा काळच ठरविणार आहे. 

शेतकर्‍यांची अर्थवाहिनी म्हणविणार्‍या जिल्हा बँकेच्या मुख्यालयाची इमारत द्वारका येथे उभी करण्यात आली. तेव्हापासूनच ही बँक चर्चेच्या भोवर्‍यात सापडली आहे. इमारत उभी करण्यासाठी त्यावेळी झालेला खर्च, प्रत्यक्ष इमारतीत वाताकूलित यंत्रणा असो की भव्य दिव्य सभागृह खरोखरच डोळे दिपवणारेच ठरले. अलीकडच्या काळात या इमारतीत घडणार्‍या घडामोडी चर्चेच्या विषय ठरू पाहत आहेत. आहेर हे पहिल्यांदाच संचालक झाले आणि त्यात त्यांना अध्यक्षपदाचा मानही मिळाला.मुळात आहेर यांना खुर्ची  मिळाली ती महत्प्रयासाने, सहजासहजी नव्हे!  नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडून माणिक कोकाटे यांच्यासारखे दिग्गज इच्छुक असताना अखेरच्या क्षणी आहेर यांनी वरीष्ठांकरवी कोकाटे यांना माघार घ्यायला भाग पाडले.

बरे, खुर्ची तर मिळाली पण, तिची उब मिळाली अवघ्या आठवडाभरासाठीच! कारण त्याचदरम्यान, संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय येऊन धडकला. त्यानंतरही आहेर यांनी ‘चिकाटी’ काही सोडली नाही. न्यायालयीन लढाई लढून ज्या कलमाद्वारे बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला होता, त्या कलम 110 (अ) नुसार निर्णयाला स्थगिती मिळूच शकत नाही, असा सहकार विभागाचा दावाही खोटा ठरविला. म्हणजे, एवढ्या कष्टाने मिळविलेल्या खुर्चीचे महत्व राहिले नाही तर नवलच!