Sat, Jul 20, 2019 09:27होमपेज › Nashik › नरेंद्र दराडे यांना सेनेकडून उमेदवारी

नरेंद्र दराडे यांना सेनेकडून उमेदवारी

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:01PMनाशिक : प्रतिनिधी 

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीचा बिगुल वाजला असून, शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देत स्वबळाचा बार उडवला आहे. या जागेसाठी भाजपा व सेनेत युती होईल, अशी चर्चा असताना सेनेेने ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेत सर्व पक्षांना जोरदार धक्का दिला. दरम्यान, निष्ठावंतांना डावलून राष्ट्रवादीतून आलेल्या दराडेंना उमेदवारी दिल्याने मतदानावेळी स्वकियांकडूनच त्यांना दगाफटका होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 21 मे ला निवडणूक होत असून, त्यामध्ये नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. तर, युती असताना ही जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र, मागील काही वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, युतीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. शिवसेनेने या पुढील सर्व निवडणुका ‘स्वबळावर’ लढण्याचा इरादा पक्‍का केला आहे.

मात्र, देशातील बदलती राजकीय हवा लक्षात घेता भाजपाने सेनेच्या वाघाला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू केले होते. ते बघता नाशिकच्या जागेसाठी दोन्ही पक्षांची युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिवसेनेने ‘स्वबळाचा’ बाणा कायम ठेवत नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना असा दराडेंचा राजकीय प्रवास राहिला आहे. राष्ट्रवादीत असताना कधी काळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. मात्र, भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सेनेची वाट धरली. सेनेकडून त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. गतवेळी विजयाने थोडक्यात हुलकावणी दिलेले अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी या जागेसाठी सेनेकडून स्वयंघोषित उमेदवारी जाहीर करत प्रचार सुरू केला होता. 

मात्र, पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत अ‍ॅड. सहाणे यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे उमेदवारी दराडे यांना मिळणार ही चर्चा होती. अखेर निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सेनेने दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सेनेच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर इतर पक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags : Nashik,  Shiv Sena, Narendra Darade, candidature, nashik news,