Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Nashik › नरेंद्र दराडे, परवेझ कोकणी यांचे अर्ज दाखल

नरेंद्र दराडे, परवेझ कोकणी यांचे अर्ज दाखल

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:32AMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी (दि.3) अनेक नाट्यमय घडामोडी पाहावयास मिळाल्या. शिवसेनेतर्फे नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेचे संचालक परवेझ कोकणी यांंनीदेखील अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान, सात जणांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेतर्फे नरेंद्र दराडे यांनी दोन अर्ज सादर केले. दराडे यांचे बंधू किशोर यांनी सेनेतर्फे डमी अर्ज भरला आहे. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, बबन घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
जिल्हा बँकेचे संचालक कोकणी यांनी ऐनवेळी दोन अर्ज दाखल केले आहेत.

विशेष म्हणजे कोकणी यांच्या अर्जावर सुचक म्हणून त्र्यंबकेश्‍वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सायली शिखरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. काँग्रेसचे ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवारी दाखल केली. पक्षाने प्रथम त्यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, ऐनवेळेस त्यांना अपक्ष अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले.राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा एबी फॉर्म गुरुवारी दाखल करण्यात आला. मात्र, यावेळी पक्षातर्फे यतींद्र पाटील यांचाही डमी अर्ज भरण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीसह इतर पक्षांमधील सार्‍यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देवळा विकास आघाडीचे अशोक आहेर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर नगरपंचायतीमधील देवळा विकास आघाडी व विरोधी जनशक्ती विकास आघाडीच्या सदस्यांनी सूचक म्हणून स्वाक्षर्‍या केल्या आहेत. देवळा व सटाणा नगरपंचायतींमधील अनुक्रमे 19 व 10 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा आहेर यांनी केला.

अखेरीस गायकवाडांचा अर्ज 

काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्‍वर गायकवाड हे अर्ज भरण्यासाठी सव्वादोन वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या दालनाजवळ पोहोचले. मात्र, त्याचवेळी पक्षातर्फे त्यांना भ्रमणध्वनीवर राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली असून, अर्ज भरू नका असे निर्देश देण्यात आले. परिणामी गायकवाड यांनी माघार घेत एबी फॉर्म पक्षाकडे जमा केला. अर्ज भरण्यासाठी शेवटचे आठ मिनिटे बाकी असताना पक्षनिरीक्षक मनोज शिंदे व नामदेव पवार यांनी गायकवाड यांना अपक्ष अर्ज दाखल करण्यास सांगितले. काँगे्रसने आता अपक्ष का होईना त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.

आज अर्ज छाननी

जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल झालेल्या अर्जांची शुक्रवारी (दि.4) छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. माघारीसाठी सोमवारपर्यंत (दि.7) मुदत देण्यात आली आहे. माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. 

Tags : Nashik, Narendra Darade, Parvez Kokani, filed, nominations