होमपेज › Nashik › शिवसेनेमुळेच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार : राणे

शिवसेनेमुळेच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार : राणे

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 27 2017 1:22AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शिवसेनेचा मराठी माणसाविषयीचा कळवळा देखाव्यासाठी असून, शिवसेनेमुळेच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केला. मुंबईतील 28 बांधकाम कंपन्यांमध्ये ठाकरे कुटुंबियांची भागीदारी असून, मुंबईत शिवसेनेच्या रूपाने कुंपणच शेत खात असल्याचा दावाही त्यांनी केला.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना पन्नास वर्षांपासून अस्तित्वात असूनही मराठी माणसाला न्याय का मिळू शकला नाही, असा सवाल करीत राणे म्हणाले की, मुंबईच्या लालबाग-परळ व अन्य परिसरात एकही मराठी माणूस शिल्लक नाही. एकेका फ्लॅटची किंमत 15 कोटींवर गेली असून, ती मराठी माणसाला परवडणारी नाही. बांधकाम व्यावसायिकांना 500 चौरस फुटांचे फ्लॅट बांधणे सक्तीचे करावे, असे आपण शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांना सुचविले होते; मात्र तसे होऊ शकले नाही. अद्यापही मराठी तरुणांना नोकर्‍या मिळू शकलेल्या नाही. याच मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्याशी आपले वाद झाले. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची 22 वर्षे सत्ता असूनही करांत भरमसाट वाढ झाली. पाणी, वीज, इमारतींच्या एफएसआयचे दर प्रचंड वाढल्याने ते मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेले. टक्केवारी मराठी माणसाकडून नव्हे, तर अन्य भाषिकांकडून मिळणार असल्यानेच शिवसेनेने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केले. मुंबईत ठाकरे कुटुंबियांची 28 बांधकाम कंपन्यांमध्ये भागीदारी असून, कुंपणच शेत खात असल्याचा आरोपही यावेळी राणे यांनी केला.