नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने जोर धरलेला असताना आता जिल्हा बँकेचे संचालक परवेझ कोकणी यांचेही नाव पुढे आले आहे. उमेदवारी देताना ‘स्वाभिमान’ जपला जाणार, की स्थानिक उमेदवार बघितला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपालिका ताब्यात ठेवण्यात भाजपाने यश मिळविले असले तरी इगतपुरी नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या निवडणुकीत भाजपासेनेला मिळालेल्या यशाने नवीन वर्षात होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपाकडून राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाऊ शकते, या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची सत्ता भाजपाला मिळाल्याने कोकणी यांचेही नाव विधान परिषदेसाठी पुढे आले. ते जिल्हा बँकेत संचालक म्हणून या तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. नगरपालिका निवडणुकीआधी कोकणी यांच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी होणार्या गाठीभेटी महत्त्वाच्या ठरल्या. त्यातच कोकणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत भेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी कोकणी यांचीही दावेदारी पक्की मानली जात आहे.