होमपेज › Nashik › नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून काँग्रेस - शिवसेनेत रस्सीखेच 

नंदुरबार झेडपीच्या सभापती पदावरून काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच 

Last Updated: Jan 22 2020 12:20PM
नंदुरबार : प्रतिनिधी 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पद निवडीवरून तापलेले राजकारण निवळत नाही तोवरच आता सभापती निवडीवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. आज किंवा उद्या सभापती निवडीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असल्याने नेत्यांच्या स्तरावर बैठका चर्चा वेगाने पार पडत आहेत. परंतु पक्षीय ओढाताण पूर्वीपेक्षा अधिक आहे. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला कोणती समिती येणार? यंदा अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद कोणाला मिळणार? तालुक्यांचा समतोल कसा राखला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रथेप्रमाणे उपाध्‍यक्षकडेच आतापर्यंत बांधकाम व अर्थ या समित्या राहिल्या असल्या तरी राम रघुवंशी यांना असा लाभ होणार की नाही? याविषयीची उत्सुकता देखील ताणली गेली आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवार ॲडव्होकेट सीमा पद्माकर वळवी तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे ॲडव्होकेट राम चंद्रकांत रघुवंशी यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून डॉक्टर कुमुदिनी गावित तर काँग्रेसकडून  काँग्रेसच्या ॲडव्होकेट सीमा पद्माकर वळवी अशी सरळ लढत होती. परंतु ऐनवेळी भाजपच्या गटनेत्या डॉक्टर कुमुदिनी गावित यांच्यासह सर्व भाजपा सदस्यांनी काँग्रेसच्या सीमा वळवी यांना जाहीर पाठिंबा देत मतदान केले. त्यामुळे सीमा वळवी यांना चक्क 56 पैकी 56 मते मिळाली आणि त्यांचा दणदणीत विजय झाला. 

अधिक वाचा : नाशिक : ३४ टीईटी अनुतीर्ण शिक्षकांना हायकोर्टाचा दिलासा 

जिल्हा परिषदेत एकूण 56 गट असून काँग्रेस 23, भाजप 23, शिवसेना 7, राष्ट्रवादी 3 असे पक्षीय बलाबल आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित गट स्थापन केलेला असल्यामुळे भाजपकडे 26 तर काँग्रेस शिवसेना एकत्र असल्यामुळे काँग्रेसकडे 30 मते होती. शिवसेनेचे ॲडव्होकेट राम चंद्रकांत रघुवंशी यांना काँग्रेसचे 23 आणि शिवसेनेचे 7 अशी 30 मते मिळाल्याने ते विजयी ठरले. ॲडव्होकेट सीमा वळवी या काँग्रेसचे माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांच्या कन्या आहेत, तर राम रघुवंशी हे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र आहेत. तीन आठवड्यांपासून चाललेली एक राजकीय स्पर्धा यामुळे संपुष्टात आली. 

तथापी आता सभापती पद देण्यावरून आणखी राजकारण तापले आहे. 27 जानेवारीच्या आत  ही निवड करायची आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे बहुमत असल्यामुळे प्रमुख समित्यांचे सभापतिपद घेण्यावरून या दोन्ही पक्षांत रस्सीखेच राहील असे दिसते. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याचा समतोल साधण्याची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे. अध्यक्षपद तळोदा तर उपाध्यक्ष पद नंदुरबारला मिळाले असल्यामुळे आता सभापतीपदाची वाटप करताना शहादा, नवापूर, अक्कलकुवा आणि अक्राणी या तालुक्यांना महत्त्व देणे काँग्रेस नेत्यांना आवश्यक झाले आहे. त्यातही शिवसेनेने दोन सभापती पदांची मागणी लावून धरली आहे. शिवसेनेला कोणत्या समित्यांचे सभापती पद द्यावे यावरून सध्या खल चालू आहे. अशातच काँग्रेसचे अध्यक्षपद बिनविरोध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधून देखील एक सभापतिपद मिळावे असा सूर निघू लागला आहे. दरम्यान भाजपातील एका मान्यवर सदस्याने देखील सभापती पदाची मागणी केल्याचे समजते. नियमानुसार विरोधी पक्षातील सदस्यांना समित्यांमध्ये सामावून घेतले जाते. त्यावरून भाजप राष्ट्रवादीत सुद्धा रस्सीखेच सुरू झाली आहे.

अधिक वाचा : मनसे नेत्याची मुख्यमंत्र्यांवर विखारी टीका; 'उद्धवा अजब तुझे सरकार'

अध्यक्ष, उपाध्यक्ष पद देण्याघेण्याची बोलणी चालू होती. त्या कालावधीत तापीकाठा पलीकडील म्हणजे नवापूर-नंदुरबार वगळता तळोदा-अक्कलकुवा भागाला यंदा अध्यक्षपद दिले जावे असा आग्रह काँग्रेस पक्षातील सदस्यांनी धरला होता. त्यामुळे ऐनवेळी अजित नाईक यांना अध्यक्षपदाची उमेदवारी माघारी घ्यावी लागली होती आणि तळोदा तालुक्यातील ॲडव्होकेट सीमा वळवी यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. परिणामी आता सभापतीपदाच्या वाटपा प्रसंगी नवापूरमधून जोरदार दावा होण्याची शक्यता दिसत आहे. शहादा तालुक्यातील अभिजीत पाटील हेदेखील नाराज झाले असून, त्यांना महत्त्वाचे पद अपेक्षित आहे. असे अनेक सदस्य आपापली फिल्डिंग लावण्यासाठी सरसावले आहेत.