होमपेज › Nashik › नंदुरबार जिल्ह्यात ढगफुटी

नंदुरबार जिल्ह्यात ढगफुटी

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:20AMनंदुरबार : प्रतिनिधी

जिल्ह्यात गुरुवारी (दि.16) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवापूर तालुक्यातील सरपणी आणि रंगावली नदीला आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला असून पुरामुळे पाच जणांसह 57 गुरे दगावली आहेत. तर शेकडो घरांचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. रंगावली नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह  शर्थीच्या प्रयत्नानंतर हाती लागला आहे. तर सरपणी नदीच्या पुरामुळे विसरवाडी येथील पूल कोसळून धुळे-सुरत महामार्गावरची वाहतूक खंडित झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली. यामुळे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा तालुक्यात 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील आष्ट्ये येथे 70 मिमी, धडगाव तालुक्यातील मोलगी भागात 80 मिमी, तर अन्यत्रदेखील अशाच मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. या धुवाधार पावसामुळे नवापूर तालुक्यात सर्वाधिक हानी झाली आहे. रंगावली नदीला आलेल्या महापुरामुळे काठालगतच्या गावांमध्ये पाणी घुसून शेकडो घरांचे नुकसान झाले. पुरात घराघरातील साहित्य वाहून गेल्याने नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिस्थितीची तातडीने दखल घेत बचाव कार्य सुरू केले.