Wed, Jul 17, 2019 18:06होमपेज › Nashik › पर्यटकांच्या हजेरीने नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्य बहरले 

पर्यटकांच्या हजेरीने नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्य बहरले 

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:06PM

बुकमार्क करा

सायखेडा : दीपक पाटील

पावसाळ्यात नांदूर मध्यमेश्‍वर धारणातील सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा, तर हिवाळ्यात येथील पक्षीअभयारण्य, यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे, तसेच वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे नांदूरमध्यमेश्‍वर (चापडगाव) महत्त्वपूर्ण पर्यटन केंद्र ठरू पाहत आहे. मात्र, येथे गरज आहे ती सोयी-सुविधांची!

नाशिकच्या पूर्वेकडे (सायखेडामार्गे) अवघ्या 40-45 किलोमीटर अंतरावर असलेल्या निफाड तालुक्यातील खानगावथडी येथे गोदावरीच्या पात्रावरील गोदा-कादवाच्या संगमावर 1907 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून पावसाळ्यात कोसळणार्‍या पाण्यामुळे, तर हिवाळ्यात या धरणाच्या फुगवट्यावर (बॅकवाटर) देशी, विदेशी पक्ष्यांचे केंद्र असलेल्या अभयारण्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. बंधार्‍याच्या बारमाही पाण्याने या भागातील शेती क्षेत्राबरोबरच अनेक गावांची तहान भागली. तर पक्षी अभयारण्यामुळे हा भाग हिवाळ्यात स्थानिक पक्ष्यांबरोबरच विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जात आहे. कालपरत्वे येथे गाळ साचत उंचवटे तयार झाले. परिणामी, येथील भाग सुजलाम् सुफलाम् होतो, तर स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर झाले. थोड्याच कालावधीत हे स्थान पक्षीतीर्थ म्हणून नावरूपाला आले. मात्र, या भागातील रस्ते खडतर असून, सोयी-सुविधांची वानवा असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

1986 मध्ये हा भाग अभयारण्य म्हणून अधिसूचित केला गेला. नाशिक वन्यजीव विभागाकडून क्षेत्र व्यवस्थापन करण्यात येते. धरणक्षेत्रात अनेक पक्ष्यांची गर्दी असते, तर विविध प्रकारच्या माशांच्या जातीही येथेे पाहायला मिळतात. नांदूरमध्यमेश्‍वर बंधार्‍याचा सायखेडा, चाटोरीपर्यंत थोप तसेच बारमाही वाहणारी गोदावरी त्यामुळे नदीकाठावरील अनेक गावे सुजलाम् सुफलाम् झाली. तर अभयारण्य तसेच, बंधारा यामुळे नांदूरमध्यमेश्‍वर पर्यटनासाठी एक केंद्र ठरू पाहत आहे. पुरातन मंदिरांची खानच या भागात असून, पाण्याचे मुबलक प्रमाण, जंगल, ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांचा या भागात अधिवास नेहमीच असतो. मात्र, अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या या भागाचा विकास झाल्यास रोजगार उपलब्धीबरोबरच हे ठिकाण तालुक्याचे वैभव होऊ शकेल.

या बाबी होणे गरजेचे

गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित (निधीचा विनियोग न झाल्याने) राहिलेल्या या अभयारण्यात पर्यटक वाढीसाठी अभयारण्याला जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती होणे, मुक्कामासाठी सोयी-सुविधा निर्माण करणे, उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून चार महिन्यांत पक्षी, अभयारण्याविषयी जाहिराती होणे, रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे आदी बाबी झाल्यास गोदाकाठ भागाबरोबरच राज्यात अभयारण्याचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल.

योग्य ठिकाणी दिशादर्शकांचा अभाव

मूळ चापडगाव येेथे असलेले पक्षीनिरीक्षण केंद्र शोधण्यासाठी पर्यटक अनेकदा मार्ग चुकतो. नाशिक-सायखेडा-करंजगाव हा जवळचा मार्ग आहे. तर नाशिक-सायखेडा-भेंडाळी-म्हाळसाकोरे-चापडगाव व नाशिक-पिंपळस-कोठूर-करंजगाव-चापडगाव आणि नाशिक-निफाड-शिवरे हे पर्यायी मार्ग आहेत. अनेक जोडरस्ते असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावल्यास पर्यटक इतरत्र भरकटणार नाहीत. 

आढळणारे पक्षी, प्राणी, वनस्पती 

साधारण 100 स्थानिक, 80 स्थलांतरित तर 60 प्रकारचे स्थानिक स्थलांतरित पक्षी येथे आढळतात. यात टिल्स, गडवाल, शॉवलर, क्रेन, पिनटेल आदी स्थलांतरित पक्षी, तसेच पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, मोर शराटी, मोठा रोहित, क्रॉच-कुलंग आदी स्थानिक स्थलांतरित पक्षी, तर पाणकोंबडी, तलवार बदक, तवंग, थापट्या, भूवई, लालसरी, लहान बगळा, जांभळी पाणकोंबडी, मुग्ध बलाक, आयबीस, स्टॉर्क आदी स्थानिक पक्ष्यांबरोबरच या ठिकाणी पक्ष्यांप्रमाणेच उदमांजर, कोल्हे, मुंगुस, लांडगे, रानडुक्कर, मृदु कवच कासवे, विविध प्रकारचे साप, तर ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांचा अधिवासही बघायला मिळतो. तर जलाशयात 24 विविध जातीचे मासे, 400 पेक्षा अधिक वनस्पतींची विविधता आहे. दरवर्षी शेकडो देशी-विदेशी, रंगीबेरंगी पक्ष्यांचे माहेरघर भरतपूर म्हणून नावलौकिकास आले आहे.