Fri, Jul 19, 2019 18:30होमपेज › Nashik › नांदूरमध्यमेश्‍वर धरणावर सुरक्षेचे तीन तेरा

नांदूरमध्यमेश्‍वर धरणावर सुरक्षेचे तीन तेरा

Published On: Aug 20 2018 1:38AM | Last Updated: Aug 19 2018 10:27PMनिफाड : वार्ताहर

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाने मेहरबानी केल्याने धरणक्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातून वाहणार्‍या गोदावरी अन् कादवा नदीपात्राच्या संगमावरील नांदूरमध्यमेश्‍वर धरणही तुडुंब झाले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, येथील सुरक्षा व्यवस्था ‘राम भरोसे’ असल्याचे दिसून येते.

निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्‍वर धरणाच्या गेटवरील धोकादायक सेल्फीमुळे गेल्यावर्षी सुरक्षाव्यवस्था सतर्क करण्यात आली होती. पावसाळ्यात डोंगरदर्‍यात यावर्षीही अनेकांचा सेल्फीमुळे बळी गेला आहे, तर काही ठिकाणी सेल्फी घेताना झालेल्या अपघातामुळे प्रशासन व्यवस्थेची मोठी तारांबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नांदूरमध्यमेश्‍वर धरणावरील सुरक्षा व्यवस्थाच सुस्त असल्याचे दिसते आहे. धरणाच्या भिंतीवरून पाण्याच्या लाटा सुरू आहेत. त्यामुळे धरणाच्या भिंतीवरील रस्ता पूर्णपणे शेवाळलेला आहे. या रस्त्यावरून वाहतूक बंद असतानाही दुचाकीस्वार त्यावरून वाहने घेऊन जात सेल्फी काढण्याची हौस पूर्ण करीत आहेत. तर धरणातील पाणी विसर्ग सुरू असल्याने दरवाजापुढील पुलाखालून वेगाने वाहणार्‍या पाण्यावरून फोटो काढण्यासाठी हौशी युवक-युवती येतात. तर पाण्याच्या वेगवान  प्रवाहातही कपडे धुण्यासाठी महिला वर्ग दिसून येतो. विशेष बाब म्हणजे धरणाच्या पाच दरवाजांकडील मोटार रूमकडे जाणार्‍या जिन्याचा दरवाजाही सताड उघडा असल्याने पर्यटकांच्या उत्साहाला उधाण येते. धरणाच्या गेटलगतच असलेल्या मार्गावर एका बाजूने सुरक्षा बॅरिकेड्सही तुटलेले आहे. या दुर्लक्षित बाबींमुळे अपघातासारख्या घटना घडून जीवितहानी होऊ शकते. याचे भान तरुणाईला नसल्याचे दिसते. मात्र, त्यासाठी नांदूरमध्यमेश्‍वर धरणावरील सुरक्षाव्यवस्थेतील कमकुवतपणाही तितकाच जबाबदार आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष घातले पाहिजे.