होमपेज › Nashik › नांदगावसह पाणी योजनेच्या कर्मचार्‍यांचे वेतन रोखणार

नांदगावसह पाणी योजनेच्या कर्मचार्‍यांचे वेतन रोखणार

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:46PMनाशिक : प्रतिनिधी

नांदगावसह 56 खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडील थकीत पाणीपट्टीच्या वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी योजनेवरील कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याचा ठराव करण्यात आला. आतापर्यंत नुसतेच वेतनापोटी खर्च होणारे अडीच कोटी रुपयांचे फलितही समोर येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या इमारतीतील कै. रावसाहेब थोरात सभागृहात सभेचे कामकाज झाले. नांदगावसह 56 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या वसुलीचा आढावा सुरू  असताना चांदवड तालुक्यातील 42 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी सेस फंडातून 15 लाख रुपये तरतूद करण्याची मागणी सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केली.

17 लाख रुपये वीज बिल थकल्याने योजना आठ महिन्यांपासून बंद आहे. त्याचवेळी सदस्य यतींद्र कदम यांनी डॉ. कुंभार्डे यांच्या मागणीस विरोध दर्शविताना 56 खेडीच्या वसुलीची माहिती विचारली. दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च होत असताना वसुली 10 टक्केदेखील नसल्याचे सांगत ज्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वसुली 65 टक्के नसेल तर कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याचे पत्र काढले, त्याचप्रमाणे 56 खेडी योजनेवरील कर्मचार्‍यांचेही वेतन रोखावे, अशी मागणी केली.  

वेतन रोखल्यास हे कर्मचारी वसुली तर करतील, असा दावा करण्यात आला. यात हस्तक्षेप करीत डॉ. कुंभार्डे यांनी कर्मचार्‍यांच्या वेतनावरच अडीच कोटी रुपये खर्च होत असल्याकडे लक्ष वेधले. चर्चेअंती वेतन रोखण्याचा ठराव करण्यात आला. दुसरीकडे सदस्य भास्कर गावित यांनी अन्य पाणीपुरवठा योजनांनाही निधी देण्याची मागणी केली. चर्चेअंती चांदवड तालुक्यातील 42 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी तरतूद करण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक बोलाविण्याचा तोडगा सांगळे यांनी काढला.

यावेळी उपाध्यक्षा नयना गावित, बांधकाम सभापती मनीषा पवार, शिक्षण सभापती यतींद्र पगार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे उपस्थित होते.