Wed, Jun 26, 2019 18:02होमपेज › Nashik › नाशिक, जळगावात घातपाताचा कट

नाशिक, जळगावात घातपाताचा कट

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 09 2018 10:58PMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी (29) आणि लीलाधर ऊर्फ विजय ऊर्फ लंबू ऊर्फ भैया लोधी (32) यांच्याजवळ तीन गावठी बॉम्ब सापडले आहेत. त्यांना नाशिकसह जळगावमध्ये घातपात करायचे होते, अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींना रविवारी सुट्टीकालीन विशेष सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएसने ही माहिती न्यायालयात दिली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एटीएसने याप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक केली होती. चौकशीतून जळगावच्या साकळी भागात रहात असलेल्या सूर्यवंशी आणि लोधी यांची नावे समोर आली. एटीएसने दोघांनाही ताब्यात घेतले. एटीएसने सूर्यवंशी याच्या घरातून डीव्हीडी, पाच पॉकेट डायरी आणि दोन सिमकार्ड असलेले मोबाईल जप्त केले आहेत. लोधी याच्या घरामध्ये एटीएसला तीन गावठी बॉम्बसह, स्फोटकांचे साहित्य, दोन मोबाईल, चार पेनड्राईव्ह आणि दोन नंबर प्लेट सापडल्या आहेत.

तिन्ही बॉम्ब पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली. तसेच आरोपींजवळून दोन कार आणि सहा मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून, या गाड्या चोरीच्या असल्याचा संशय एटीएसला आहे. सूर्यवंशी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपींनाही गुन्ह्यासाठी मोटारसायकल पुरविल्याचा संशय एटीएसला आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे दोन्ही आरोपींना 14 दिवस कोठडी सुनावण्याची मागणी केली. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी या मागणीला विरोध केला. न्यायालाने एटीएसच्या रिमांडनुसार कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करत आरोपींना 17 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्याचे आदेश दिले.