Tue, Apr 23, 2019 13:46होमपेज › Nashik › आयात उमेदवारावरून ‘राष्ट्रवादी’त नाराजीचा सूर

आयात उमेदवारावरून ‘राष्ट्रवादी’त नाराजीचा सूर

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

बेरजेचे गणित व निवडून येण्याची क्षमता या दोन निकषांवर यापुढे पक्षात उमेदवारी दिली जाणार आहे. याच निकषांवर अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत पक्ष सहाणेंच्या मागे उभा राहील असाही विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. मात्र, पक्षातंर्गत सक्षम उमेदवारांची वानवा आहे का असा प्रतिप्रश्‍न आता पक्षातील नाराज गटाने उपस्थित केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही सारेच आलेबल नाही असेच चित्र आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीतून मनपाचे शिक्षण विभागाचे माजी सभापती अशोक सावंत तसेच  दिलीप खैरे हे इच्छुक होते. पक्षातर्फे मात्र, ऐनवेळेस अ‍ॅड. सहाणे यांच्या गळ्यात पक्षाच्या उमेदवारीची माळ घालत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, बाहेरून आयात केलेल्या सहाणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आला. विद्यमान आमदार जयंत जाधव हे उमेदवारीसाठी सक्षम नाहीत का असा मुद्दाच या गटाने उपस्थित केला आहे. 

या गटाने प्रदेशाध्यक्षांची भेट घेत नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटपर्यंत ही भेट होऊ शकली नाही.  त्यामुळे सहाणेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत सारेच आलबेल नसल्याचे चित्र आहे. सहाणे यांना पक्षाने उमेदवारी दिली असून, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकार्‍याने कामाला लागण्याचे निर्देश पाटील यांनी दिली. त्याच्याच जोडीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष बळकटीसाठी वेळ पडल्यास इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच पाटील यांनी केले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच डावलले जाणार असल्याची भावना पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या विधान परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

Tags : Nashik, NCP, tone, resentment