Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Nashik › राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा फेब्रुवारीत नाशिकमध्ये

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा फेब्रुवारीत नाशिकमध्ये

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:06PMनाशिक : प्रतिनिधी

तिसर्‍या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा येत्या 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान नाशिक जिल्ह्यात काढण्यात येणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे प्रभारी आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या मुंबई नाका परिसरातील कार्यालयात बैठक घेण्यात आली. 

राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याची टीका पाटील यांनी केली. सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात हल्लाबोल यात्रा सुरू केली असून, तिसर्‍या टप्प्यात ती नाशिकमध्ये पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान जिल्ह्यात  वरिष्ठ नेत्यांच्या पाच ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

दि.16 फेब्रुवारीला येवला तालुक्यात यात्रेचे आगमन होणार असून, येथे मुक्‍काम होणार आहे. दि.17 फेब्रुवारीला निफाड, दिंडोरी आणि कळवण तालुक्यात यात्रा पोहोचणार आहे. दि.18 फेब्रुवारीला सटाण्यात मुक्‍काम केल्यानंतर यात्रा नंदुरबार जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. यात्रेच्या तयारीचा भाग म्हणून आ. जयंत पाटील शनिवारी नाशिकमध्ये आले होते. त्यांनी राष्ट्रवादी भवनात शहर, तसेच जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक बोलवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार देवीदास पिंगळे, उत्तम भालेराव, दिलीप बनकर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे आदी उपस्थित होते.