Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Nashik › राष्ट्रवादीच्या सहाणे यांना भाजपाचा पाठिंबा जाहीर

राष्ट्रवादीच्या सहाणे यांना भाजपाचा पाठिंबा जाहीर

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:08AM
नाशिक : विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना  पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीचे आत्तापर्यंतचे राजकीय समीकरणच फिरले आहे. सुरुवातीला तिरंगी होणारी लढत आता दुरंगीवर येऊन ठेपल्याने शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि आघाडीचे अ‍ॅड. सहाणे यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. भाजपाच्या या पाठिंब्याने आगामी निवडणुकांमधील शिवसेना भाजपाच्या युतीत आणखी दरी निर्माण झाली आहे. 

नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपाशी संपर्कात असलेल्या परवेझ कोकणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळाले होते. कोकणी यांच्यासह भाजपातील नगरसेवकांनाही भाजपाच्या भूमिकेची प्रतीक्षा होती. परंतु, निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाने आपले पत्ते खुले केले नाही. पालघर येथील लोकसभेची निवडणूक आणि कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने दगाफटका केल्याने त्याचा वचपा    काढण्यासाठी भाजपाने शिवसेनेशी काडीमोड घेत थेट आघाडीचे उमेदवार सहाणे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यासाठी भाजपाने शहरातील हॉटेल ज्युपिटर येथे नाशिक व मालेगाव मनपा तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिकांमधील नगरसेवकांना बैठकीसाठी बोलावून घेतले. बैठकीत संघटनमंत्री किशोर काळकर यांनी सहाणे यांना पाठिंबा जाहीर करत पक्षादेश दिला.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, गटनेते संभाजी मोरुस्कर, सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, दादा जाधव, अनिल भालेराव आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाकडे 171 इतका मतदानाचा आकडा आहे. या पाठिंब्याने सहाणेंचे पारडे जड झाले आहे. मात्र, गुप्‍त मतदान पद्धत असल्याने कोण कुणाला मतदान करतो आणि कोण कुणाचे मतदार फोडतो यावरच सर्व निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. एकूणच भाजपाच्या पाठिंब्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली असून, नगरसेवकांना आता चांगला भाव आला आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांची नगरसेवकांशी जुळवून घेताना दमछाक होणार आहे. 

कोकणींनाच होती उमेदवारी : खरे तर निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या कोकणी यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर केली जाणार होती. परंतु, कोकणी यांनीच काही गोष्टींमध्ये निर्णय घेण्यास विलंब लावला. यामुळेच त्यांना उमेदवारी मिळू शकली नसल्याचे भाजपातील विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अन्यथा कोकणी यांना मुस्लिम समाजाची 97 मते आणि भाजपाची दीडशेहून अधिक मते तसेच शिवसेनेतील नाराज असलेल्या दुसर्‍या गटाची अशी सुमारे तीनशेहून अधिक मते मिळाली असती, असे गणितही भाजपाने कोकणी यांच्यासमोर मांडले होते. परंतु, कोकणी यांच्याकडून होकार येण्यास विलंब झाल्याचे बोलले जात आहे.