Sun, Aug 25, 2019 00:17होमपेज › Nashik › फसव्या कर्जमाफीने सत्ताधार्‍यांचा चेहरा उघड

फसव्या कर्जमाफीने सत्ताधार्‍यांचा चेहरा उघड

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:19AMसटाणा : वार्ताहर

प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये टाकून ‘अच्छे दिन’ आणणारे पंतप्रधान मोदी काळा पैसा तर आणू शकले नाहीत, मात्र घोटाळेबाजांना संरक्षण देत असल्यामुळे उलटपक्षी प्रत्येक देशवासीयांच्या डोक्यावर पंधरा लाखाचे कर्ज होण्याची भिती आहे. फसव्या कर्जमाफीने शासनाचा खरा चेहरा उघड झाला असून, शेतकर्‍यांवरील अन्याय, वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून शासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. खोट्यानाट्या भूलथापा मारून सत्ता काबीज करणार्‍या भाजपा-सेनेला सत्तेतून घालविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, गेल्यावेळी झालेली चूक पुन्हा केल्यास आपणास ब्रम्हदेवदेखील माफ करणार नाही, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात काढण्यात येत असलेल्या हल्लाबोल मोर्चाचे रविवारी (दि.18) बागलाण तालुक्यात आयोजन करण्यात आले. त्यावेळी आयोजित जाहीर सभेप्रसंगी मुंडे बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, आ.पंकज भुजबळ, आ.जयदेव गायकवाड, आ.दीपिका चव्हाण, आ.जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, रंजन ठाकरे, प्रेरणा बलकवडे, जि.प.सभापती यतीन पगार आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण यांनी तालुक्यातील सिंचनासह विविध विकासकामांना विद्यमान शासनकाळात खीळ बसल्याचे सांगून शेतकरीवर्गाला अडचणीच्या काळातही वार्‍यावर सोडल्याचे स्पष्ट केले. माजी आमदार संजय चव्हाण यांनीही यावेळी शहर, तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट करून गेल्या चार वर्षांत सिंचनाचे एक फुटही काम पुढे सरकले नसल्याचे सांगून शेतीप्रश्‍नी भाजपा शासन बिलकुलही गंभीर नसल्याचा आरोप केला.

यावेळी खा.सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी गटनेते काका सोनवणे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, विजय वाघ, जे.डी.पवार, बबू सोनवणे, अमोल बच्छाव, रेखा शिंदे, सुरेखा बच्छाव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंडे यांनी उडवली भाजपाची खिल्ली

हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा टप्पा आहे. शेवटच्या पाचव्या टप्प्यापर्यंत भाजपा शासनही गेलेले असेल. ‘पवारसाहेब, आम्हाला माफ करा’ असे डिजिटल बॅनर देशात सर्वप्रथम सटाण्यात लागले. मोदी लाटेतही बागलाणने राष्ट्रवादीलाच निवडले, जे तुम्हाला तेव्हाच कळले होते, ते देशाला आत्ता कळले. अच्छेदिनची गावोगावी, चौकाचौकात चेष्टा होते. मग हल्लाबोल मोर्चात त्यावर चर्चा का नको? भाजपावाल्यांचे इंजेक्शन भलते भारी, ते दुखत नाही.आम्हाला न कळता पेट्रोलचे भाव दुप्पटीने वाढले. मुख्यमंत्री फसवनीससाहेब, पाच पिढ्यांचे शेतकरी आहेत, त्यांना गाईचे दुध काढता येते, पण बसता येत नाही असे त्यांच्याकडून सांगितले जाते. म्हणून आत्ता गाय टेबलावर चढवू पण उभे राहून का असेना, त्यांना दुध काढायलाच लावणार. मोदींची नक्कल करताना, ‘बहोत हुई महंगाई की मार’ असे म्हणून उपस्थितांना वाक्य पूर्ण करायला लावल्यानंतर, समोरून ‘मोदी सरकार’उत्तर येताच खास वैदर्भी लकबीत ‘घे गोंधून..’असे म्हणून मुंडेंनी खिल्ली उडविली.