नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भाजपाने भूमिका स्पष्ट केल्यानंतरच आपला उमेदवार जाहीर करण्याची रणनिती आखली आहे.
येत्या 21 मे रोजी मतदान होऊन 24 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून, येत्या 3 मेपर्यंत त्यासाठी मुदत आहे. दुसरीकडे राजकीय हालचालींना अद्याप वेग आल्याचे दिसून येत नाही. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे स्वबळावर लढण्याची या पक्षाची भूमिका अजून तरी ठाम आहे. भाजपाला मात्र अजूनही युती होण्याची आशा आहे. त्यामुळेच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आणि उमेदवारी अर्ज घेऊन गेले असले तरी पक्षनेत्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर याही निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची खेळी खेळली जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजे, शिवसेना स्वबळाच्या घोषणेचा शब्दही खरा होईल आणि भाजपेयींचाही उद्देश सफल, असे गणित त्यामागे मांडण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या हालचालींवर राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष ठेवून आहे. भाजपाने उमेदवार न दिल्यास या पक्षाचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. दोन्ही पक्षांचे नेते वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाची निवड रविवारी (दि.29) होणार असून, त्यानंतरच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या कामाला वेग येणार आहे.
Tags : Nashik, NCP candidate, BJPs role,