Tue, May 21, 2019 04:44होमपेज › Nashik › नोटाबंदीमुळे शेतकरी व व्यावसायिक उद्ध्वस्त 

नोटाबंदीमुळे शेतकरी व व्यावसायिक उद्ध्वस्त 

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:30AMउगाव : वार्ताहर

देशातील सव्वाशे कोटी जनता फसली आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवणार्‍या पंतप्रधानांनी स्वप्नभंग केला. प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख येणार, विदेशातील काळा पैसा आणणार, बेरोजगारी दूर करणार अशा आश्‍वासनांचा पाऊस पाडला. मात्र, सामान्यांचे हात रितेच राहिले. महागाई वाढली आहे. रेशनमध्ये गहू, तांंदूळ, साखर मिळेनासे झाले पण घरच्या म्हशींना खाऊ घालणारा मका नरेंद्र, देवेंद्र देऊ लागलेे. नोटाबंदीने सर्वसामान्यांच्या बुडाखाली आग लागली. नोटाबंदीने शेतकरी तर जीएसटीने व्यावसायिक उद्ध्वस्त केला आहे. भाजपाची काळोखी राजवट संपविण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निफाडच्या शिवाजी चौकात केला.

शेतकरी  सर्वसामान्य जनतेच्या धोरणांच्या विरोधातील भाजपा-सेनेच्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी निफाड येथील शिवाजी चौकात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते.

व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आ. जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शशिकांत शिंदे, निफाडचे माजी आमदार दिलीपराव बनकर, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार दीपिका चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, जयंत जाधव, संग्राम कोते, रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, कॅशलेस म्हणजे बिनदमडीचे राहायचे. मोदी साहेब तुमचे कॅशलेस कार्ड घेऊन नाशिकच्या बैल बाजारात येऊन बैल खरेदी करून दाखवाच, असा मार्मिक टोला मुंडे यांनी लगावला. रास्वसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा समाचार घेत सैनिकांचा अपमान झाल्याचे सांगत खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, गरिबांच्या पोटाला भूक लागते. त्यांच्या ताटात दाणा नसेल तर तुमचा डिजिटल इंडिया काय कामाचा! पवार साहेबांनी कधी गरिबीचे मार्केटिंग केले नाही. जर आम्ही काहीच विकासाची काम केली नसती तर गरीब घरचा पंतप्रधान झाला असता का, असा सवाल करीत सत्ता येते आणि जाते त्याचे काही वाटत नाही. आम्हाला मंत्रालयातील होणार्‍या आत्महत्यांची सत्ता नको तर सामान्यांच्या जनमनातील हवी.

प्रारंभी निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचे स्वागत माजी आमदार दिलीप बनकर यांनी केले. शांतीनगर चौफुली ते शिवाजी चौकात हल्लाबोल यात्रेतील नेते बैलगाडीवर स्वार होत सभास्थानी पोहचले. यावेळी जि. प. सदस्या अमृता पवार, मंदाकिनी बनकर, सुरेश कमानकर, नाना महाले, विष्णुपंत म्हैसधुणे, सचिन पिंगळे, माणिक शिंदे, अश्‍विनी मोगल, नंदन भास्कर, रतिश टर्ले, सागर कुंदे, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, बंटी शिंदे, दीपक गाजरे, नामदेव शिंदे, महेश चोरडिया, नीलेश बोरस्ते, शरद मोगल, मनोज पानगव्हाणे, सोपान खालकर, सुरेखा कुशारे, अनिल बोरस्ते, ज्ञानेश्‍वर पानगव्हाणे, विलास मंडलिक आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांनी प्रास्ताविक केले. विक्रम रंधवे यांनी सुत्रसंचालन, नगरसेवक देवदत कापसे यांनी आभार मानले.