Thu, Apr 25, 2019 03:38होमपेज › Nashik › एन. एम. आव्हाड यांचे निधन

एन. एम. आव्हाड यांचे निधन

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:26PMनाशिक : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, जिल्ह्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व वास्तुरचना, भूगर्भशास्त्राचे अभ्यासक निवृत्ती महादेव तथा एन. एम. आव्हाड (78) यांचे मंगळवारी (दि.10) मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आव्हाड यांच्या रूपाने उमदे, बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व हरपल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. 

आव्हाड यांच्या पश्‍चात पत्नी मनोरमा, मुले अनिल, अ‍ॅड. संदीप व प्रशांत यांच्यासह सुना, नातवंडे असा परिवार आहे. तीन दिवसांपासून आव्हाड यांची प्रकृती बिघडली होती. न्यूमोनिया व मूत्रपिंडात संसर्ग झाल्याने त्यांना मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी 7.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव नाशिक येथील त्यांच्या गंगापूर रोड येथील ‘अवंती’ या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर ते व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, नितीन भोसले, ज्येष्ठ कार्यकर्ते पुंजाभाऊ सांगळे, ज्येष्ठ विधिज्ञ का. का. घुगे, माजी महापौर यतिन वाघ, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर, उद्धव निमसे, विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, अर्जुन टिळे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, अतुल चांडक, शाहू खैरे, उदय सांगळे, निवृत्ती डावरे, व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष उपाध्यक्ष हेमंत धात्रक यांच्यासह राजकीय, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिक अमरधाम येथे सायंकाळी आव्हाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अल्पचरित्र : आव्हाड यांचा जन्म 8 एप्रिल 1940 रोजी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झाला. नाशिक येथे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1965 मध्ये पुणे येथे बी. ई. (सिव्हिल) ही पदवी प्राप्‍त केली. सार्वजनिक बांधकाम विभागात काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये ‘स्पॅन कन्स्ट्रक्शन्स’ ही स्वत:ची संस्था सुरू केली. दरम्यानच्या काळात पंडित धर्मा पाटील, शांतारामबापू वावरे, व्यंकटराव हिरे यांच्याशी त्यांचा संपर्क आला व त्यातून ते राजकारणाकडे वळले. सन 1978 मध्ये काँग्रेसच्या (इं) तिकिटावर त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. सूर्यभान गडाख, सुदाम सांगळे हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत आव्हाड यांना अवघ्या चार हजार मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला व सांगळे विजयी झाले. सन 1979 मध्ये आव्हाड यांनी सिन्नर तालुक्यातील दापूर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यात ते विजयी होऊन अर्थ व बांधकाम सभापतिपदी विराजमान झाले. तत्कालीन पदाधिकार्‍यांना मुदतवाढ मिळाल्याने आव्हाड यांनी सन 1990 पर्यंत म्हणजे सुमारे 12 वर्षे बांधकाम सभापती म्हणून काम पाहिले व या काळात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी जिल्ह्यात पाझर तलावांची मोठ्या प्रमाणात कामे केली. 

सन 1996 मध्ये आव्हाड यांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाच्या तिकिटावर नाशिक लोकसभेची निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सन 2003 मध्ये ते नाशिकच्या व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत निवडून आले व सन 2007 पर्यंत त्यांनी संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले. या काळात त्यांनी जिल्हाभर संस्थेचा विस्तार करीत आवश्यक तेथे शाळेच्या नव्या इमारती उभारल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्थेच्या अनेक गावांतील शाळा भाडेतत्त्वावरील जागेतून स्वमालकीच्या इमारतीत भरू लागल्या. याशिवाय रयत शिक्षणसंस्था, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था, सार्वजनिक वाचनालय (नाशिक), नाशिक शिक्षण प्रसारक संस्था आदी संस्थांवरही त्यांनी काम पाहिले. 

भूगर्भशास्त्र व भूकंप या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. पाणीसाठा व भूकंप यांच्या परस्पर संबंधांवर त्यांनी संशोधन केले होते. कोयना भूकंप संशोधन व परिणाम, खर्डी भूकंप : कारणे व संशोधन या विषयावर त्यांनी लेखन केले होते. या विषयावर राज्य शासनानेही त्यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. साहित्य क्षेत्रातही आव्हाड यांना विशेष रुची होती. ‘वाकडी वाट’, ‘निवृत्तीनामा’, ‘दूरचे डोंगर’, ‘जनमनातील माणसं’, ‘विज्ञान तरंग’, ‘चेतना चिंतामणीचा ठाव’, ‘भूकंप’, ‘भूकंपाचा पाण्याशी असलेला संबंध’, ‘पाऊसपाणी’, ‘ग्लोबल वॉर्मिंग व ग्लोबल वॉर्निंग’ अशी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सिन्नर भूषण, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचा जीवनगौरव आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांचे दौरेही केले होते.  

पाझर तलावांचे जाळे : आव्हाड यांची जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापतिपदाची कारकीर्द विशेष गाजली. या काळात त्यांनी केलेल्या पाझर तलावांच्या कामांमुळे अनेक गावांतील दुष्काळ हटला. सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यात पाझर तलावांचे जाळे निर्माण करीत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. जिल्ह्यात कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांची कामे त्यांच्या काळात सर्वाधिक झाली होती.  

साखर कारखान्यांची उभारणी : आव्हाड यांनी राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या उभारणीत वास्तुतज्ज्ञ म्हणून हातभार लावला. साखर कारखान्यांसाठी सल्लागार म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. पळसे येथील नाशिक साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.