Thu, Jun 27, 2019 13:53होमपेज › Nashik › आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

Published On: Aug 28 2018 1:34AM | Last Updated: Aug 28 2018 12:15AMद्वारका : वार्ताहर 

शिक्षण, नोकरी तसेच सरकारी व निमसरकारी वसतिगृहांमध्ये मुस्लिम समाजातील मुला-मुलींना 10 टक्के आरक्षण मिळावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.27) दुपारी 1 वाजता द्वारका चौकात रास्ता रोको करण्यात आला. नाशिक जिल्हा मुस्लिम विकास आरक्षण संघर्ष समिती आणि माहीन भावी संस्थेतर्फे हे आंदोलन छेडण्यात आले. 

रंगनाथन मिश्रा कमिशन, सच्चर कमिटी, डॉ. महमूद कमिशन आधारित शैक्षणिक, सरकारी नोकरी व निमसरकारी सेक्टरमध्ये मुस्लीम समाजास 10 टक्के आरक्षण मिळावे. यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष हनीफ बशीर यांच्या नेतृत्वाखाली  रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी जावेद पठाण, नदीम शेख, विशाल वारूले,  दाऊद शेख, मोमीन शेख, जावेद इब्राहिम आदींसह मुस्लिम समाजातील महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने  सहभागी  झाले. सुमारे एक तास चाललेल्या आंदोलनामुळेे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. भद्रकाली व मुंबईनाका पोलिसांचा बदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ठोस भूमिका न घेतल्यास जनआंदोलन छेडणार

आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजास 16 टक्के व मुस्लिम समाजास शैक्षणिक 5 टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यात आला. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शैक्षणिक आरक्षण तसेच नोकरीतील आरक्षणाबाबत योग्य भूमिका मान्य केली. राज्यातील सरकार बदलले व भाजपचे सरकार आले. मात्र, या सरकारने चार वर्षांपासून कुठलीही भूमिका घेतलेली नाही. म्हणून सरकारने त्वरित मुस्लिम समाज आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा याहूनही मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा समितीतर्फे यावेळी देण्यात आला.