Thu, Nov 15, 2018 10:12होमपेज › Nashik › नाशिक : तरुणीची हत्या करून नग्न अवस्थेत सोडले

नाशिक : तरुणीची हत्या करून नग्न अवस्थेत सोडले

Published On: Mar 24 2018 5:37PM | Last Updated: Mar 24 2018 5:37PMनाशिक : वार्ताहर 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव येथील १९ वर्षीय तरुणीच्या तोंडावर बैलगाडीच्या जूखंडाने प्रहार करून निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. रंजना चंदर महाले असे मृत तरुणीचे नाव आहे. 

रंजना आई आणि बहिणीसोबत गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतातील घरात राहत होती. मृत तरुणीच्या दोन्ही बहिणींचे विवाह झाले होते. मात्र, नवऱ्याने सोडून दिल्यानंतर तिची एक बहिण विधवा आईच्या घरीच होती. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी संबंधित तरुणीची आई ताईबाई चंदर महाले यांच्यावर येऊन पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी मोठ्या मुलीने व रंजनाने आपल्या खांद्यावर घेतली होती. दोघी बघिणी मोल-मजुरीसाठी विनायकनगरहून गिरणारे येथे जात होत्या.

शुक्रवारी रंजनाला बघण्यासाठी पाहुणे येणार होते. त्याचच आमंत्रण देण्यासाठी तिची आई गावातील नातेवाईकांना सांगण्यासाठी गेली होती. तर मोठी बहीण मजुरीला गेल्यामुळे रंजना एकटीच घरी होती. सातच्या सुमारास रंजाना घरात एकटी असल्याचा फायदा घेत काही अज्ञातांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. रंजना मदतीसाठी आवाज देत असताना गुन्हेगारांनी तिच्या डोक्यात नांगरासाठी वापरले जाणारे जूखंडाने  जोरदार प्रहार केला. त्यातच तिचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. 

शवविच्छेदन अहवालानुसार, तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून, बलात्काराच्या प्रयत्नातून तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आई घरी आल्यानंतर तिने रंजनाला आवाज दिला. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आईने बॅटरी घेऊन घराच्या आसपास शोध घेण्यास सुरुवात केली. घराच्या समोरच खळ्यावर रंजनाचा मृत्यूदेह नग्न अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर  रात्री १ वाजता अज्ञाताविरोधात कलम ३०२ अनव्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिस निरीक्षक रवींद्र सोनवणे करत आहेत.

Tags : Crime, Murder Of Young Girl,  Ganeshagar. Polce.  Nashik Police,  FIR unknown person