Mon, Jun 24, 2019 21:15होमपेज › Nashik › मालमत्तांचा लिलाव सुरू असतानाच ५७ लाख वसूल

मालमत्तांचा लिलाव सुरू असतानाच ५७ लाख वसूल

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:41PMनाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या विविध कर विभागाच्या वतीने शहरातील 50 मालमत्ताकर थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींची लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि.25) दादासाहेब गायकवाड सभागृह येथे राबविण्यात आली. त्यात लिलावाच्या भीतीने 50 पैकी 13 मिळकतधारकांनी जागेवरच थकबाकी अदा केल्याने एकाच दिवसात मनपाच्या तिजोरीत 57 लाख 68 हजार जमा झाले असून, उर्वरित 39 थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला. 

महापालिकेने पाणीपट्टी व मालमत्ताकर थकबाकी वसूल करण्यासाठी विविध उपक्रम व उपाययोजना हाती घेतल्या होत्या. शहरातील काही बडे थकबाकीदार असे होते की, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा कर अदा केला नाही. यामुळे असा ठेंगा दाखविणार्‍या मालमत्ताधारकांना यावेळी महापालिकेने आपला हिसका दाखविला.

केवळ नोटिसा न बजावता संबंधितांच्या मालमत्ता जप्‍त करून त्यांचे मूल्यांकन ठरविण्यात आले आणि त्यानंतर जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही हाती घेतली. त्यानुसार बुधवारी गायकवाड सभागृहात 50 मालमत्तांचा जाहीर लिलाव ठेवण्यात आला. त्यास पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक थकबाकीदारांनी येऊन निम्मी रक्‍कम भरण्याची तयारी दाखविली. परंतु, संपूर्ण थकबाकी भरत असाल तरच लिलाव थांबविण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. त्यानुसार 50 पैकी 13 मिळकतधारकांनी थकबाकी भरली. त्यापोटी मनपाला 57 लाख 68 हजार 805 रुपये महसूल मिळाला. त्यात यशोधन हेल्थ केअर, के अ‍ॅण्ड एफ के कोकणी, नेम गुलामगैस कोकणी, अहमद महंमद रफिक, निरामय फार्मास्युटिकल, मायक्रो मकेर्स, विशाल प्रदीप देशमुख, अभिजित शिवाजी देशमुख, काशीनाथ केरू जाधव, हिला शेरजाद शारूख हौसी पटेल यांनी कर थकबाकी अदा केली. 

50 पैकी राहिलेल्या 39 मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने बोली होऊ शकली नाही. यामुळे या मालमत्तांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला असून, त्यांची पुन्हा एकदा जाहीर नोटीस प्रसिद्ध करून लिलाव केला जाणार असल्याची माहिती उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.  

Nashik,  Municipal taxes issue, 57 lakh recovered, nashik news,