Thu, Jun 20, 2019 01:56होमपेज › Nashik › बनावट पावती पुस्तकाद्वारे ना फेरीवाला क्षेत्रात दंडवसुली

बनावट पावती पुस्तकाद्वारे ना फेरीवाला क्षेत्रात दंडवसुली

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 10:58PMसातपूर : वार्ताहर

महापालिकेच्या नावे बनावट पावती पुस्तक छापून त्याआधारे सातपूर परिसरातील ना फेरीवाला क्षेत्रातील व्यावसायिकांकडून सर्रासपणे दंड वसुली केली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी (दि.26) उघडकीस आला. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

अशोकनगर भाजीमंडई रस्त्यावरील  ‘ना फेरीवाला’ क्षेत्रात व्यवसाय करणार्‍या फेरीवाले, फळ विक्रेते, इतर व्यवसायिकांना याठिकाणी व्यवसाय कसे करता, सदर रस्ता हा  ‘ना फेरीवाला झोन’ आहे. त्यामुळे दंडाची पावती फाडावी लागेल व व्यवसाय करायचे असल्यास अजून पैसे देऊन परवानगी घ्या असे सांगत दोघा भामट्यांकडून दंडवसुली सुरू होती. यावर एका व्यावसायिकाने 400 रुपये दिले देखील. परंतु त्याला पावती दिली नाही. त्यामुळे दुसर्‍या एका व्यवसायिकला 26 जानेवारीची मनपाला सुट्टी असेल, असा संशय आला. त्यांनी थेट मनपा कर्मचार्‍यांना दूरध्वनी करून विचारले असता, अशाप्रकारे मनपाचे कर्मचारी दंड आकारत नाहीत, असे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर हे भोंदू कर्मचारी असल्याचा उलगडा झाला. त्यावर त्यांना अशोकनगर पोलीस चौकीमध्ये नेण्यात आले. यावेळी संशयित नंदू शंकर शिंदे (वय 46, रा. शांतीनगर, मखमलाबाद), संतोष काळूराम मडोरे (वय 38, लंबोदर अपार्टमेंट, मखमलाबाद) यांच्याकडून काही रोख रक्कम, मनपाचे बनावट व्हिजिट बुक, पावती पुस्तक व मोबाइल असे साहित्य जमा करण्यात आले. संशयितांविरोधात व्यावसायिकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने सातपूर पोलिसांनीही या बनावट कर्मचार्‍यांना समज देऊन अदखलपात्र तक्रार नोंदवून घेत सोडून दिले. दरम्यान, घडलेली घटना व गुन्ह्याबाबत व्यावसायिकांनी तक्रार देऊन गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांनी केले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण करीत आहेत.