होमपेज › Nashik › ‘स्वीकृत’साठी काँग्रेसतर्फे एमआयएम शहराध्यक्षांना संधी

‘स्वीकृत’साठी काँग्रेसतर्फे एमआयएम शहराध्यक्षांना संधी

Published On: Dec 03 2017 1:06AM | Last Updated: Dec 02 2017 10:23PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्य पदासाठी शनिवारी (दि.2) अखेरच्या दिवशी केवळ चार अर्ज दाखल झाले. तौलनिक संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसतर्फे दोन सदस्यांना संधी असताना गटनेत्यांनी केवळ एकच अर्ज दिला. मालेगाव महागटबंधन आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसने दोन, शिवसेनेकडून एक अर्ज सादर झाला. तर, चमत्काराच्या आशेवर भाजपाने प्रशासनाला ‘जर-तर’च्या कोंडीत पकडत एक अर्ज मनपा आयुक्‍त कार्यालयात जमा केला.

मनपा निवडणूक होऊन सहा महिने उलटल्यानंतर अखेर स्वीकृत सदस्य निवडप्रक्रियेला प्रारंभ झाला. शनिवारी (दि.2) गटनेत्यांमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. 84 सदस्यांच्या सभागृहातील तौलनिक संख्याबळानुसार काँग्रेस व महाआघाडीला प्रत्येकी दोन तर, शिवसेनेला एक स्वीकृत सदस्य देता येऊ शकतो. त्यानुसार महाआघाडी व शिवसेनेने आपल्या कोट्यानुसार अर्ज दिले. परंतु, सत्ताधारी काँग्रेसने केवळ एकच सदस्य सुचविला. तो देखील ‘एमआयएम’चे शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल मलिक मो.युनूस यांना संधी दिल्याने काँग्रेस-शिवसेना युतीला ‘एमआयएम’च्या बाहेरुन भक्‍कम पाठिंब्यावर पुन्हा एकदा शिक्‍कामोर्तब झाले. केवळ पाचच सदस्य निवडून द्यावयाचे असले तरी त्यात भाजपाला कोटा नाही. तरी देखील ऐनवेळी राजकीय घडामोडी पूरक ठरल्यास संधी मिळू शकते, या आशेवर अर्ज दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करून ठेवण्यात आली. 

महाआघाडीतर्फे अ‍ॅड. गिरीश बोरसे व मो. अमिन मो. फारुक यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, गटनेते बुलंद एकबाल आदी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा पाचच्या सुमारास शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर, अ‍ॅड. संजय दुसाने, माजी नगराध्यक्ष दीपक भोसले यांनी भिमा भडांगे यांचा अर्ज दाखल केला. प्रशासन उपायुक्‍त डॉ. प्रदीप पाठारे यांनी अर्ज स्वीकारले. भाजपला अर्ज दिलाच नसल्याने तो स्वीकारला नसल्याचे नगरसचिव राजेश धसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्या अर्जावर आयुक्‍त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.