Fri, Aug 23, 2019 15:17होमपेज › Nashik › मनपातील सत्ताधार्‍यांना राज्यशासनाकडून घरचा आहेर

मनपातील सत्ताधार्‍यांना राज्यशासनाकडून घरचा आहेर

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:22AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मनपा शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळ स्थापन करण्याबाबत महापालिकेने शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. परंतु, यासंदर्भात भाजपाचीच सत्ता असलेल्या शासनाने समितीबाबत असलेला कायदा नियमबाह्य वाटत असल्यास तसा ठराव विखंडित करण्यासाठी सादर करा, असे सांगून मनपातील सत्तारूढ पक्षालाच घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

शासनाच्या या उत्तरामुळे मनपातील भाजपाचे सदस्यांना नियुक्‍ती देण्याचे स्वप्नही भंगल्यासारखेच झाले आहे. शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळ स्थापन करून त्याठिकाणी कार्यकर्त्यांना सभापती, उपसभापती तसेच सदस्य म्हणून नियुक्‍ती देवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. त्यासाठी शिक्षण मंडळ स्थापन करण्याविषयीचे मार्गदर्शन मनपाच्या सत्ताधारी पक्षाने शासनाकडे मागितले होते.

परंतु, याबाबत शासनाकडून असा बदल करता येणार नसल्याचे कळवित कायदा नियमबाह्य वाटत असल्यास महासभेत ठराव करून तो विखंडित करण्यासाठी सादर करा, असे कळविले आहे. यामुळे भाजपा पदाधिकार्‍यांची अडचण वाढली असून, कार्यकर्त्यांना शिक्षण मंडळासाठी दिलेला शब्द पूर्ण कसा करावा, असा प्रश्‍न पडला आहे. मनसेच्या कार्यकाळात त्यावेळच्या शासनाने शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण समिती स्थापन करण्याचे आदेश सर्वच महापालिकांना दिले होते. त्यानुसार महापालिकेत त्यावेळी शिक्षण मंडळाऐवजी समिती स्थापन केली गेली. परंतु, आता पुन्हा शिक्षण मंडळ आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तसा पाठपुरावाही सत्तारूढ पक्षाकडून केला जाता होता. मात्र, त्यातही अडचण वाढल्याने शिक्षण मंडळही लांबणीवर पडले आहे.