Wed, Sep 19, 2018 22:05होमपेज › Nashik › महापालिकेला ठेवींमधून वर्षाला मिळतात ४० कोटी

महापालिकेला ठेवींमधून वर्षाला मिळतात ४० कोटी

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 10 2018 11:28PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेच्या विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 600 कोटींच्या 125 ठेवी आहेत. यामुळे नाशिक मनपाची आर्थिक बाजू आजमितीस भरभक्‍कम असून, ठेवींच्या बदल्यात दरवर्षी 40 कोटी 64 लाख रुपयांचे व्याज मनपाच्या तिजोरीत जमा होत आहे. 

महापालिकेच्या आर्थिक स्थितीविषयी अनेकदा चर्चा होत असते. सध्या जकात आणि त्यानंतर एलबीटी बंद झाल्याने मनपाचे उत्पन्न घटले आहे. यामुळे महसूल वाढविण्याच्या दृष्टीने मनपाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. विकासकामांबरोबरच प्रशासकीय खर्चातही दरवर्षी मोठी वाढ होत असल्याने महापालिकेला निधीची चणचण भासत असते. अशा आर्थिक ओढाताणीतही आणि तत्काळ निधीची आवश्यकता भासल्यास निधीची कमतरता पडू नये, यासाठी महापालिकेने राखीव फंडाबरोबरच शहरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आपला पैसा ठेवींच्या रूपाने सुरक्षित ठेवला आहे.

आजमितीस अशा 125 ठेवींद्वारे 600 कोटी रुपये बँकांमध्ये जमा आहेत. सन 2016-17 मध्ये 557 कोटी रुपये ठेवी जमा होत्या. त्यावर 2017-18 मध्ये व्याज मिळून या ठेवी आता 598 कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. या ठेवीतून महापालिकेला वर्षाला 40 कोटी 64 लाख रुपये इतके व्याज मिळते. बँकनिहाय जमा असलेल्या ठेवी अशा : देना बँक- 62 कोटी 75 लाख, इंडियन बँक- 27 कोटी 27 लाख, ओरिएन्टल बँक- 56 कोटी 91 लाख, स्टेट बँक ऑफ हैदराबाद- 16 कोटी 14 लाख, पंजाब नॅशनल बँक- 78 कोटी 45 लाख, स्टेट बँक ऑफ इंडिया- 35 कोटी 14 लाख, सेन्ट्रल को-ऑप. बँक- 38 लाख 94 हजार, बँक ऑफ महाराष्ट्र- 46 कोटी 98 लाख, बँक ऑफ इंडिया- 19 कोटी 96 लाख, बँक ऑफ बडोदा- 38 कोटी 21 लाख.