होमपेज › Nashik › टेरेसवरील हॉटेलचालकांना महानगरपालिकेचा दणका 

टेरेसवरील हॉटेलचालकांना महानगरपालिकेचा दणका 

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:56PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

शहरातील विविध ठिकाणच्या इमारतींवरील टेरेसवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉटेलचालकांना मनपाच्या नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे आजवर राजकीय आणि पैशांच्या जोरावर सर्रासपणे आपले उखळ पांढरे करू पाहणार्‍यांना मनपा प्रशासनाने मोठा धक्‍का देऊ केला आहे. प्रशासनाच्या या कारवाईच्या धसक्याने अनेकांना गपगुमानपणे टेरेसवरील कामे हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

मुंबईतील कमला मिलमधील इमारतीवरील पब व रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 लोक मृत्युमुखी पडले. या रेस्टॉरंटला परवानगीच नसल्याची बाब समोर आल्याने मुंबईसह इतरही शहरांमधील इमारतीच्या टेरेसवरील हॉटेलचाही मुद्दा उपस्थित झाला.  यासंदर्भात राज्य शासनाने सर्वच महापालिका तसेच संंबंधित आस्थापनांना आदेशित करत अशा अनधिकृत हॉटेलचालकांवर कारवाईचे आदेश दिले होते.

मनपा आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत नगररचना विभागाला सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यात 38 हॉटेल्स अनधिकृतपणे सुरू असल्याची बाब समोर आली असून, संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर अंतिम नोटीस देऊन अतिक्रमण विभागामार्फत ही बांधकामे हटविण्यात येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर संबंधित हॉटेलचालकांची मनमर्जी कारभार सुरू होता. तसेच नगररचनामधील काही अधिकार्‍यांकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. अनेक हॉटेल मनपा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असूनही अधिकार्‍यांचे टेरेसवरील हॉटेलवर नजर जाऊ नये याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या हॉटेलांना नोटीस 

पश्‍चिम विभाग - कॉलेजरोडवरील प्लेअर अ‍ॅण्ड बार, ए. डी. सफायर हॉटेल अ‍ॅण्ड बार, रुफ टेक, एन्टर द ड्रॅगन, फर्माइश, पतंग, याहू, कोपा कबाना, मनोरथ, 21 सेंचुरी, बार्बीक्यु बिस्ट्रो, हॅप्पी नाशिक टाइम्स, टॉक ऑफ द टाऊन, डी सेलर टेरेस, सम्राट, पंचवटी विभाग - न्यू पंजाब, प्रेस्टीज पॉइंट, मजा, कारवा, राऊ, सिडको विभाग - शिवसागर, सुरेश पगार यांचे हॉटेल, सुयोग, साई राजा दरबार, साई विजय, न्यू पद्मा, नाशिकरोड विभाग - श्रद्धा, नार्लेदा, स्कायबार, गायकवाड क्‍वालिटी फूड्स, नाशिक पूर्व - कामत, पाथर्डी विभाग- पोर्टीको सरोवर, हेमराज, द पाल्म सेलिब्रेशन, हॉटेल ग्रॅण्ड अश्‍विन.