Tue, Jun 25, 2019 21:58होमपेज › Nashik › मनपा अधिकार्‍याची आत्महत्या

मनपा अधिकार्‍याची आत्महत्या

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 02 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

कामाच्या तणावामुळे नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागातील सहायक अधीक्षकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.2) दुपारी उघडकीस आली. संजय दादागुणाजी धारणकर (47, रा. गंगापूर रोड) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. 

गुरुवारी (दि.2) दुपारी धारणकर यांनी घरात ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धारणकर यांच्या आत्महत्येची माहिती समजताच मनपामधील अधिकारी-कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. धारणकर यांच्या सहकार्‍यांनी कुटुंबीयांचे  सांत्वन केले. धारणकर यांनी 16 ऑक्टोबर 1990 पासून पाणीपुरवठा विभागात बोअर अटेडंट म्हणून कामकाजास सुरुवात केली. त्यानंतर प्रकल्प विभागात त्यांची बदली झाली. 9 जून 1993 ला त्यांना कनिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली. त्याच विभागात 7 फेब्रुवारी 1996 मध्येत्यांची वरिष्ठ लिपिकपदी बढती झाली.

त्यानंतर संगणक विभाग व आस्थापना विभागात सेवा बजावली. 22 फेब्रुवारी 2013 साली सहायक अधीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांच्याकडे मनपा मुख्यालयातील घरपट्टी विभाग आणि पश्‍चिम विभाग अशा दोन्ही ठिकाणचा घरपट्टीसंदर्भातील कामकाजाचा भार होता. धारणकर यांनी विविध विभागांत काम केल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला होता. मितभाषी आणि कामाप्रती सजग अशी धारणकर यांची सहकार्‍यांमध्ये ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सहकार्‍यांना धक्का बसला. काही दिवसांपासून धारणकर रजेवर होते. नुकतेच ते कामावर रुजू झाले होते. धारणकर यांच्या पश्‍चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोहन आणि मुलगी राधिका असा परिवार आहे. रोहन हा पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, मुलगी निर्मला कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पाचवीला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुणे येथून मुलगा रोहन सायंकाळी घरी परतला. 

महापौरांनी केले सांत्वन 

रात्री 8 च्या सुमारास त्यांचे पार्थिव निवासस्थानी आणण्यात आले. याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांनी धारणकर यांच्या पत्नी योगिता यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी नगरसेविका स्वाती भामरे, हर्षा बडगुजर, नगरसेवक सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते.