Mon, Jun 17, 2019 02:56होमपेज › Nashik › पाइपलाइन अन् मलवाहिकांसाठी महापालिकेला 1800 कोटींची गरज 

पाइपलाइन अन् मलवाहिकांसाठी महापालिकेला 1800 कोटींची गरज 

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:29PMनाशिक : प्रतिनिधी

शहरातील पाणीपुरवठा व मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी 1200 कोटी तर मलवाहिकांकरता 600 कोटींची महापालिकेला आवश्यकता आहे. लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती यानुसार भविष्यात पाइपलाइनची रचना असेल यासाठी हायड्रोलिक मॉडेल देखील मनपाने तयार केले आहे. 

भविष्यातील विचार करता शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या यावर आधारित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मनपा आयुक्‍तांच्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाने हायड्रोलिक मॉडेल तयार केले असून, त्याआधारे पाइपलाइनची कामे करण्यात येणार आहे. यामुळे शहरात नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्याचा उद्देश साध्य होऊ शकणार आहे. शहरात बहुतांश ठिकाणी 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइन आहेत. त्या बदलण्यासाठी तसेच नवीन वसाहतींमध्ये लोकसंख्योच्या आधारे पाइपलाइन टाकण्यासाठी मनपाला 1200 कोटींची आवश्यकता आहे. त्यानुसार दरवर्षी आर्थिक तरतूद करून हे उद्दिष्ट साध्य करण्याचा मनपा आयुक्‍तांचा प्रयत्न असून, तसे आदेश दिले आहेत. महापालिकेमार्फत सध्या गंगापूर धरण समूहातून थेट पाइपलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा वितरणच्या प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी समतोल साधला जात नाही.

तसेच, बर्‍याच ठिकाणी लोकसंख्येचे प्रमाण अधिक असूनही कमी क्षमतेची पाइपलाइन असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच, काही ठिकाणी जुन्या पाइपलाइन असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. पाइपलाइन जुन्या असल्याने पाइपलाइन फुटणे, लिकेज होणे, दुषित पाणीपुरवठा होणे यासारखे प्रकार वारंवार होतात. याचद‍ृष्टीने त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी हायड्रोलिक मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या परिसराची भौगोलिक परिस्थिती आणि तेथील लोकसंख्येचा विचार करून योग्य त्या क्षमतेची पाइपलाइन टाकली जाणार आहे. यापूर्वी लोकसंख्या आणि भौगोलिक स्थिती विचारात न घेताच नळकनेक्शन दिले जायचे. परंतु, आता याच बाबी विचारात घेऊन त्या-त्या डायमीटरची पाइपलाइन जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील सांडपाणी नदीमध्ये वा नाल्यांमध्ये न सोडता ते मलवाहिकांच्या माध्यमातून एसटीपीमध्ये येऊन त्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने मलवाहिकांचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 600 कोटींची गरज आहे. ही कामे देखील टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहेत.

2 हजार कि. मी. पाइपलाइन 

पुढील 25 वर्षांत नाशिकसाठी किती पाणी लागू शकते त्यादृष्टीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पाणी आरक्षण, पाइपलाइनची गरज, पाइपलाइनचा डायमीटर, जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्र अशा सर्व बाबींचा विचार त्यात करण्यात आला आहे. गंगापूर धरण ते जलशुद्धीकरण केंद्र अशी 62 कि. मी. ची पाइपलाइन (रॉ वॉटर पाइपलाइन) आहे. जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभापर्यंत शहरात 195 कि. मी. पाइपलाइन (प्युअर वॉटर पाइपलाइन) आहे. तसेच, विविध ठिकाणचे जलकुंभ ते ग्राहकांपर्यंत असलेल्या पाइपलाइनची लांबी 1855 कि. मी. इतकी आहे. अशी एकूण 2112 कि. मी. इतक्या शहरात पाइपलाइन आहेत.