Sat, Aug 24, 2019 21:18होमपेज › Nashik › स्मार्ट सिटीतील योजनांचे प्रकल्प अहवाल तयार करा

स्मार्ट सिटीतील योजनांचे प्रकल्प अहवाल तयार करा

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:27PMनाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेले विविध प्रकल्प आणि कामांबाबतचे सविस्तर लाइफ सायकल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे आदेश मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी योजनेतील विविध विकासकामांचा आढावा घेताना दिले आहेत. 

आयुक्‍तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर सोमवारी (दि.12) मुंढे यांनी दिवसभर खातेप्रमुख आणि विविध खात्यांमधील कामकाजाचा आढावा घेतला. त्यात स्मार्ट सिटी योजनेतील विविध प्रकल्पांचे सादरीकरण त्यांच्यासमोर झाले. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत राबविण्यात येणार्‍या योजना व प्रकल्पांचा अहवाल तयार करण्यात येणार असून, प्रत्येक योजना कशा पद्धतीने पूर्ण करता येईल, त्यासाठी किती कालावधी लागेल, निधीची तरतूद आहे का यासह विविध बाबींचा समावेश करण्यास त्यांनी सांगितले आहे.

डेट्रा ड्रायव्हन सिटी फोरमच्या अहवालाचा अभ्यास करण्याची सूचनाही त्यांनी केली. शहरातील सार्वजनिक वाहतूक आणि पार्किंग धोरण ठरविण्याच्या दृष्टीने त्यांनी माहिती घेण्यास सांगितले. स्काडा यंत्रणेंतर्गत शहरात वॉटर मीटर बसविण्यात येणार आहेत. पाण्याची गळती थांबावी आणि प्रत्येक मीटरचे बिलिंग होण्याच्या दृष्टीने स्काडा वॉटर मीटरची उपयुक्‍तता तपासण्याचे आदेशही त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना दिले आहेत. आजमितीस शहरातील सिडको, सातपूर तसेच जुने नाशिक भागात अनेक वॉटर मीटर नाहीत.

तर काही नादुरुस्त असल्याने मोघम पद्धतीनेच बिलिंग केले जात आहे. त्यानुसार स्काडा वॉटर मीटर पद्धत फायदेशीर ठरणार आहे.  तसेच  मुंढे यांनी महापालिकेतील विविध विभागांत फेरफटका मारुन कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता न आल्याने सहा कर्मचार्‍यांना नोटीसा बजावल्या. यामध्ये बांधकाम विभागाच्या दोन, तर आस्थापनाच्या तीन कर्मचार्‍यांचा समावेश आहे.एका कार्यकारी अभियंत्यालाही नोटीस बजावली असून, त्यांचे एक दिवसाचेे वेतन कपात केले आहे.

फायली निकाली काढण्यास ‘अल्टिमेटम’

नाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला आहे. आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी महापालिकेतील जुन्या व प्रलंबित फायली निकाली काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मनपात विविध विभागांतील जवळपास दोन ते अडीच हजार फायली निकाली काढण्यासाठी त्यांनी खातेप्रमुखांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 

शुक्रवारी (दि.9) मुंढे यांनी आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्याच दिवशी त्यांनी आपली कार्य पद्धती दाखवून देत अधिकारी व कर्मचार्‍यांना घाम फोडला. कार्यभार हाती घेतला नाही तोच दुसरा शनिवार आणि रविवार अशा सलग दोन सुट्ट्या आल्या. परंतु, या सुट्ट्या कर्मचार्‍यांसाठी कामाचा वार ठरल्या. प्रत्येक विभागातील कर्मचार्‍यांना वर्कशीट तयार करण्याबरोबरच सहा गठ्ठा पद्धतीने फायलींचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिले होते. यामुळे सुट्टीच्या दोन्ही दिवस कर्मचार्‍यांनी फायलींचे वर्गीकरण करण्याबरोबरच स्वच्छता मोहीमही हाती घेतली होती.

सोमवारी (दि.13) मुंढे यांनी सकाळी 10 वाजेलाच मनपात हजेरी लावत विविध खात्यांचा आढावा घेतला. त्यात जवळपास दोन ते अडीच हजार फायली अशा आढळून आल्या की त्याबाबत अद्याप मनपा प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे या फायलींवर कार्यवाही करण्याचे आदेश देत त्यासाठी एका आठवड्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आला. त्याचबरोबर यापुढील कामकाजाची पद्धत ही झिरो पेंडन्सी अशीच असावी, अशी अपेक्षाही त्यांनी खातेप्रमुखांकडून व्यक्‍त केली.