Wed, Apr 24, 2019 00:22होमपेज › Nashik › मनपाचे सहायक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता

मनपाचे सहायक अभियंता रवींद्र पाटील बेपत्ता

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 26 2018 10:58PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतील कामकाजाच्या ताण-तणावामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील हे शनिवारी (दि.26) सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये मनपा प्रशासनाच्या कारभाराविषयी असंतोष व्यक्‍त केला जात आहे. 

नाशिकरोड येथे शनिवारी मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापालिकेतील 150 हून अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतात. यामुळे रवींद्र पाटील यांनीही नाशिकरोडला कार्यक्रमास जाऊन येेतो, असे सांगून ते सकाळी सहाला घराबाहेर पडले. परंतु, त्यानंतर ते घरी परतलेच नसल्याचे त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्याचबरोबर    गेल्या काही दिवसांपासून ते महापालिकेतील कामकाजामुळे ताण-तणावातही असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मनपा आयुक्‍तांनी गेल्या 24 मे रोजी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व सहायक अभियंता अशा 49 अभियंत्यांच्या एकाच दिवशी बदल्या केल्या. त्यात पाटील यांचेही नाव होते. तसेच त्यांच्याकडे गंगापूर रोड, आनंदवली, सावरकरनगर परिसराची जबाबदारी होती.

सावरकरनगरमधील ग्रीनफिल्डवर झालेल्या कारवाईमुळे मनपा आयुक्‍त अडचणीत आले आणि त्यांना न्यायालयाची माफी मागावी लागली. याशिवाय ग्रीनफिल्डचे बांधकाम पुन्हा बांधून देण्याची नामुष्कीदेखील मनपावर ओढावल्याने या प्रकरणात आपल्यावरही कारवाई होऊ शकते, अशी भीती पाटील यांना वाटत होती. यामुळे ते गेल्या दोन दिवसांपासून चिंताग्रस्त होते. तसेच ग्रीनफिल्ड प्रकरणी प्रशासनाने पाटील यांच्यासह आणखी एका अभियंत्यावर कारवाई करण्यासाठी फाइल मागवून घेतली होती, असे समजते. या कारवाईच्या भीतीपोटीच ते बेपत्ता झाले असावे, अशीदेखील चर्चा मनपातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये आहे.

दरम्यान, सकाळी 8.40 या कालावधीत ते नाशिकरोड येथील रेल्वे स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवर आढळून आल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार गंगापूर पोलीस तपास करत असून, रेल्वेस्थानक येथून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासून पुढील तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र पाटील यांचा दूरध्वनीही घरी असल्याने त्यांचे लोकेशन कळणे हे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यांच्या चारचाकी वाहनात एक चिठ्ठी आढळून आल्याची चर्चा असून, त्यात त्यांनी काय नमूद केले आहे याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अधिकारी-कर्मचार्‍यांत असंतोष

सध्या महापालिकेतील कारभार पाहता बहुतांश कर्मचारी व अधिकारी गेल्या काही दिवसांपासून ताण-तणावातच काम करत आहेत. प्रशासनाकडून तडकाफडकी कारवाई केली जात असल्याने अनेकजण धास्तावले आहेत. या भीती व दडपणाखालीच काम सुरू असल्याने आता अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन याविरोधात पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र पाटील हे बेपत्ता झाल्याचे समजताच गंगापूर पोलीस ठाणे व ते राहत असलेल्या गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या निवासस्थानी अभियंते व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. पाटील यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. यामुळे त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. कामाशी काम याप्रमाणेच ते महापालिकेत कामकाज करत होते.