Fri, Jul 19, 2019 07:05



होमपेज › Nashik › मनपा मिळकतींचा गैरवापर करणार्‍यांचे धाबे दणाणले 

मनपा मिळकतींचा गैरवापर करणार्‍यांचे धाबे दणाणले 

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AM



नाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या मिळकत सर्वेक्षणाची फाईल मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या दणक्यामुळे पुन्हा उघडल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. यातील 903 मनपा मिळकतधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, मनपाच्या मिळकतींचा वापर करून त्यावर पैसा कमविणार्‍या संस्थांची पोलखोल केली जाणार आहे. 

सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक व सेवाभावी तसेच धर्मादाय संस्थांना मनपाच्या मिळकती अत्यंत अल्प भाडेतत्त्वावर दिल्या जातात. परंतु, शहरातील अनेक संस्थांनी सामाजिक हेतूलाच हरताळ फासून मनपाच्या या मिळकतींमधून पैसा कमविण्याचा धंदाच उभा केला आहे. सध्या मनपाच्या मिळकतींमध्ये अभ्यासिका, ग्रंथालय, व्यायामशाळा, विविध प्रशिक्षण, शाळा, विविध प्रकारची कार्यालये थाटण्यात आली आहेत. तसेच, अनेक सभागृहांमध्ये तर लग्न सोहळ्यांपासून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या संस्था संबंधित कार्यक्रम आयोजकांकडून हजारो रुपयांच्या देणग्या उकळत असतात. त्याबाबत कोणत्याही प्रकारची पावती वा लेखी दिले जात नाही. तसेच, शहरातील मनपाच्या मालकीचे क्रीडांगणे देखील अनेक संस्थांच्या ताब्यात आहेत. या संस्थांकडूनही त्याठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांच्या बदल्यात हजारो रुपये उकळले जातात. या बदल्यात मनपाला कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. 

याउलट संबंधित भाडेकरू संस्थांना अत्यंत अल्प असे शुल्क आकारले जाते. अगदी एक रुपयापासून ते एक हजार रुपयांपर्यंतचे वार्षिक शुल्क आकारले जात असल्याने मनपाच्या कोट्यवधींच्या मिळकतीतून मनपाच्या तिजोरीत काहीच महसूल जमा होत नाही. हीच बाब हेरून मनपाच्या या मिळकतींतून चालू बाजारभावाप्रमाणे भाडे आकारल्यास मनपाला चांगला महसूल प्राप्‍त होऊ शकतो, असे धोरण अवलंबविण्यात येत असून, सध्या मिळकतींवर रेडिरेकनरनुसारच भाडे आकारले जात आहे. पूर्वीच्या अनेक मिळकतींचा व संबंधित संस्थांचा करारनामा संपुष्टात आल्याने आता नव्याने या संस्थांकडून भाडे आकारणी केली जाणार आहे. त्यानुसार तत्कालीन आयुक्‍त प्रवीण गेडाम यांनी मनपाच्या मिळकती व गाळ्यांचे तडकाफडकी सर्वेक्षण अनेकांची पोलखोल त्याचवेळी केली होती. परंतु, त्यांची बदली झाली आणि ही फाईल लालफितीत पडली. परंतु, आता तुकाराम मुंढे यांनी पुन्हा गेडाम यांची फाईल हाती घेऊन 903 मिळकतधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे. मिळकतीचा वापर स्वत:च करतात का, मनपाबरोबर करारनामा झालेला आहे का, भाडे थकीत आहे का, मिळकतींचा वापर कशासाठी केला जात आहे अशा विविध प्रकारची माहिती नोटीसद्वारे विचारण्यात आली आहे.