Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मुंबईचा दूधपुरवठा तोडणार

मुंबईचा दूधपुरवठा तोडणार

Published On: Jul 15 2018 1:29AM | Last Updated: Jul 14 2018 11:22PMनाशिक : प्रतिनिधी 

दुधाच्या अनुदानात पाच रुपयांनी वाढ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (दि. 16) आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, जिल्ह्यातून मुंबईला दूधपुरवठा तोडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकार पोलिसांच्या बळावर आंदोलन चिरडण्याची भाषा वापरत आहे. तसे झाल्यास कार्यकर्तेदेखील प्रसंगी रस्त्यावर रक्‍त सांडत सरकारला चोख प्रत्युत्तर देतील, असा इशाराही त्यांनी दिला.

बुलेट ट्रेन, स्टार्टअप इंडियासारखे भूलभूलय्या पुढे करत सरकार राज्यातील जनतेला स्वप्न दाखवित आहेत. मात्र, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नाही. शेतमालाला हमीभाव देण्याची घोषणा निव्वळ धूळफेक आहे. सरकारची ही कृती म्हणजे ‘जखम मांडीला आणि उपचार शेंडीला’ अशी टीका वडघुले यांनी केली. दरम्यान, शेतीला पूरक जोडधंदा असलेल्या दूध व्यवसाय हाणून पाडतानाच दूध संघांच्या माध्यमातून भांडवलदारांवर हे सरकार कृपाद‍ृष्टी करत असल्याचा आरोप वडघुले यांनी केला. गुजरात, केरळ व कर्नाटकमध्ये दूध उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान दिले जात असताना महाराष्ट्रात मात्र, शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. त्यामुळे दुधाच्या प्रश्‍नावर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

रविवारी (दि. 15) मध्यरात्री 12 वाजेपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून मुंबई आणि गुजरात राज्यांना होणार दूधपुरवठा तोडण्यात येईल.आंदोलनावेळी सरकारने शेजारील गुजरात व कर्नाटक राज्यातून दुधाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा सरकारचा भ्रम असून, स्वाभिमानीसह इतर शेतकरी संघटना आक्रमकपणे हा डाव हाणून पाडतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आंदोलन चिरडण्यात येईल, असे वारंवार सांगत आहे. परंतु, सरकारच्या या धमक्यांना आम्ही भीक घालत नसल्याचे वडघुले यांनी सांगितले. 
यावेळी राजू देसले, चंद्रकांत बनकर, नितीन रोठे-पाटील, भास्कर शिंदे, विजय दराडे, नाना बच्छाव, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन अनभिज्ञ

जिल्ह्यात दररोज एक लाखापेक्षा अधिकचे दूध संकलन व वितरण होते. यातही सिन्‍नरमधून जवळपास 40 हजार लिटर दुधाचे संकलनात वाटा आहे. शेजारील नगर, जळगाव आणि धुळ्यातून नाशिकमार्गे मुंबई व गुजरातकडे दुधाची मोठी निर्यात होते. हा सर्व पुरवठा तोडण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. मात्र, या आंदोलनापासून जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे. असे कोणते आंदोलन होणार आहे का याची माहिती नसल्याने प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.

गुजरातमधून दूध येऊ देणार नाही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या सोमवारपासून पुकारलेल्या आंदोलनाला आमदार भाई ठाकूर यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनाच्या काळात गुजरातमधून एकही दुधाचा टँकर मुंबईत येऊ दिला जाणार नाही, असा इशारा पटेल याने दिल्याची माहिती हंसराज वडघुले यांनी दिली. 

दूध रस्त्यावर ओतणार नाही

हे आंदोलन शेतकर्‍यांसाठी असून त्यांनीही याला पाठिंबा दिल्या असल्याचा दावा वडघुले यांनी केला. आंदोलनकाळात कार्यकर्ते दुधाचा एकही थेंब रस्त्यावर ओतणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांनीदेखील त्यांच्याकडील दूध हे गावातच विक्री करावे. अन्यथा होस्टेल, वारीसाठी पाठवावे. नाहीतर खवा करून विक्री करावा, असे आवाहन स्वाभिमानी संघटनेने केले आहे.