होमपेज › Nashik › दरात कपात; तरी प्रवाशांची पाठ

दरात कपात; तरी प्रवाशांची पाठ

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 12:46AMनाशिक : प्रतिनिधी

मुंबई व पुणे हवाई सेवेच्या तिकीट दरात विमान कंपनीने कपात केल्यानंतरही या प्रवासाकडे नाशिककरांनी पाठ फिरवली आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर 8 मार्चपर्यंत सर्व तिकिटे उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा टक्का घसरल्याचे दिसत आहे.

नाशिकहून विमानसेवा देणार्‍या कंपनीने गत आठवड्यात तिकिटाच्या दरात घट केली. मुंबईसाठी तिकिटाचे दर 200 तर पुण्यासाठी साधारणत: 180 रुपयांनी  घटविण्यात आले आहे. या नवीन दरानंतरदेखील प्रवाशांचा या सेवेला प्रतिसाद लाभेल अशी कंपनीची धारणा होती. परंतु, कंपनीचा हा प्रयत्न फसला आहे. याचे मूळ कारण म्हणजे विमानांचे गैरसोयीचे वेळापत्रक आहे. मुंबईसाठी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार ते गुरुवार सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी तसेच शुक्रवार ते रविवार दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी विमानाचे उड्डाण होेते. या वेळा गैरसोयीच्या असल्याने नाशिककरांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. 

ओझर विमानतळावरून पुण्याला सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी विमानाचे टेकऑफ होेते. परतीच्या मार्गावर सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी नाशिकसाठी विमान आहे. परंतु,  या सेवेला प्रारंभी मिळालेला प्रतिसाद आता ओसरला आहे. याही मार्गावर दोन्ही बाजूची तिकिटे 8 मार्चपर्यंत उपलब्ध आहेत. एकूणच परिस्थिती बघता उडाण योजनेत सुरू केलेल्या या सेवांना गैरसोयीच्या वेळापत्रकांमुळे ग्रहण लागले आहे. मुंबईसाठी 1 मार्चनंतर सकाळी 7 च्या दरम्यान, लॅण्डिंगसाठी स्लॉट उपलब्ध होईल, असा विश्‍वास विमानसेवा देणार्‍या कंपनीला आहे. त्यादृष्टीने कंपनी मुंबई विमानतळाची जबाबदारी सांभाळणार्‍या जीव्हीके कंपनीसोबत चर्चा करीत आहे. हा टाइमस्लॉट उपलब्ध झाल्यास नाशिकच्या हवाईसेवेला चांगले दिवस प्राप्त होतील.